भारतीय खेळाडूंसाठी भारतीय बॅडमिंटन लीग अनुभवाकरिता उपयुक्त होईल असे सांगितले जात असतानाच ऑलिम्पिकपटू पारुपली कश्यप याने मात्र अव्वल दर्जाचे खेळाडू आपल्या यशाचे गुपीत सांगणार नाहीत असे येथे सांगून आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयपीएलबरोबर आयबीएलची तुलना करता येणार नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे तर बॅडमिंटन हा वैयक्तिक खेळ आहे. क्रिकेटमध्ये अनुभवी खेळाडू तरुण खेळाडूंना यश मिळविण्याचे रहस्य सांगत असतात कारण त्याखेरीज त्यांना विजय मिळविता येत नाही असे सांगून कश्यप म्हणाला, चीनचे खेळाडू कधीही आपल्या सरावाची माहिती सांगत नाहीत. जर आम्ही चीनच्या खेळाडूंना चांगली लढत देऊ शकतो, तर आम्हाला मलेशियन किंवा अन्य परदेशी प्रशिक्षकांची गरज नाही. प्रत्येक सामन्यातील कामगिरीचे आत्मपरीक्षण करीत आम्ही चुका सुधारू शकतो.
कश्यप पुढे म्हणाला, असे असले तरी आयबीएल स्पर्धा भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंकरिता खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या खेळाचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले तरीही त्यांना भविष्याकरिता भरपूर शिदोरी मिळू शकेल.

Story img Loader