आयपीएलच्या धर्तीवर राज्यात पहिलीच महाराष्ट्र बुद्धिबळ लीग स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. २४ ते २९ एप्रिलदरम्यान पुण्यात होणाऱ्या या स्पर्धेत सूर्यशेखर गांगुली, जी. एन. गोपाळ यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे बुद्धिबळचाहत्यांना देशातील अव्वल खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र चेस असोसिएशन व पुणे जिल्हा चेस सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत ४ एप्रिलला फ्रँचायझी संघांची निवड केली जाणार आहे. विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदच्या हस्ते हा समारंभ होणार आहे. बुद्धिबळपटूंचा लिलाव १३ एप्रिल रोजी होईल. या स्पर्धेत गांगुली, गोपाळ, एम. आर. ललितबाबू, एम. आर. व्यंकटेश, एस. अरुणप्रसाद यांचा सहभाग निश्चित झाल्यामुळे अव्वल दर्जाच्या लढती पाहावयास मिळणार आहेत.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे होणाऱ्या या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (एआयसीएफ) यांची मान्यता लाभली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, सांगली/कोल्हापूर, औरंगाबाद, जळगांव असे सहा फ्रँचायझी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात एक ग्रँडमास्टर, एक महिला ग्रँडमास्टर, एक आंतरराष्ट्रीय मास्टर यांच्यासह सहा खेळाडूंचा समावेश असेल. संघ खरेदीची किमान रक्कम अडीच लाख रुपये असून कमाल मर्यादा तीन लाख रुपये असेल. विजेत्यांना तीन लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा