सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीचा उत्तरार्ध चालू असताना हा दिग्गज फलंदाज धावांसाठी झगडतानाचे चित्र दिसत आहे, परंतु इतरांच्या निवृत्तीच्या सूचनांकडे सचिन अजिबात लक्ष देत नाही, तर आपल्या खेळाकडेच लक्ष केंद्रित करतो.
‘‘अनेक माणसे याविषयी प्रश्न विचारतात. मला निश्चितपणे आठवत आहे, २००५पासून हा प्रश्न विचारायला सुरुवात झाली. परंतु माझे तेव्हापासून हेच उत्तर होते की, मी माझ्या भूमिकेवर ठाम असेन आणि तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा,’’ असे सचिनने एका कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
निवृत्तीविषयी सातत्याने चर्चेमुळे त्रास होतो किंवा कामगिरीवर परिणाम होतो का, या प्रश्नाला उत्तर देताना सचिन म्हणाला, ‘‘याचा माझ्यावर कोणताच परिणाम होत नाही.’’
२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत ९९वे शतक साकारल्यानंतर सचिन १००व्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या उंबठय़ावर असताना प्रसारमाध्यमांनी त्याबाबत मोठय़ा चर्चा घडविल्या. याविषयी तो म्हणाला, ‘‘विश्वचषक स्पध्रेत मी ९९वे शतक साकारले. त्यावेळी माझ्या १००व्या शतकाविषयी कोणीच चर्चा केली नाही. कारण भारताने विश्वचषक जिंकणे, हे त्यावेळी सर्वासाठी महत्त्वाचे होते. विश्वचषकानंतर मात्र सर्वच प्रसारमाध्यमांनी फक्त माझ्या १००व्या आंतरराष्ट्रीय शतकाकडे लक्ष केंद्रित केले.’’
तू दररोज वृत्तपत्रे वाचतोस का, या प्रश्नाला उत्तर देताना सचिन म्हणाला, ‘‘मै न्यूजपेपर पढते रहुंगा तो कौन खेलेगा.’’ इतरांच्या सूचनांचा आपल्या कामगिरीवर परिणाम होत नाही, हे सांगताना सचिन म्हणाला की, ‘‘लोकांना त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. काही जण खेळले आहेत म्हणून ते मत प्रकट करतात. परंतु काही जण खेळलेले नाहीत, तरीसुद्धा ते आपल्या सूचना मांडतात. पण मी या सूचनांची चिंता करीत नाही.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘हा एक सौदा असतो. तुम्ही फलंदाजीला जाता, तेव्हा प्रत्येकदा शतक ठोकू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येकदा सकारात्मक प्रतिक्रिया मिळणार नाहीत. त्यामुळे इतर काय म्हणतात यावर मी नियंत्रण ठेवू शकत नाही. माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार खेळ करणे, हेच फक्त माझ्या हातात आहे. त्याकडे मी लक्ष केंद्रित करू शकतो.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा