* व्हिलावर ३-१ असा विजय ल्ल डेंबेले, अली, केन यांचे प्रत्येकी एक गोल
अ‍ॅस्टन व्हिलाचे नवीन प्रशिक्षक रेमी गॅर्डे यांना त्यांच्या पहिल्याच इंग्लिश प्रीमिअर लीगमधील (ईपीएल) सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. टोटनहॅम हॉटस्पर संघाने ३-१ अशा फरकाने अ‍ॅस्टन व्हिलावर विजय साजरा करून ईपीएलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली. मौसा डेंबेले, डेल अली आणि हॅरी केन यांनी प्रत्येकी एक गोल करून हॉटस्परने विजय साकारला, तर व्हिलासाठी जॉर्डन आयेवने एकमेव गोल केला.
ईपीएलच्या गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या हॉटस्परने या लढतीत एकहाती वर्चस्व गाजवले. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला डेंबेले याने डॅनी रोसच्या पासवर गोल करून हॉटस्परचे खाते उघडले. ईपीएलच्या नऊ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम करणाऱ्या हॉटस्परने या गोलसह आणखी एका विजयाकडे कूच केली. २५व्या मिनिटाला केन याने गोलजाळीच्या दिशेने भिरकावलेला चेंडू अगदी थोडय़ा फरकाने हुकला. मात्र, केनच्या या प्रयत्नाने व्हिलाच्या चमूत दडपण निर्माण केले आणि त्याचा फायदा ४५व्या मिनिटाला हॉटस्परने उचलला. अलीने व्हिलाची बचावफळी भेदून हॉटस्परला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर व्हिलाने आक्रमक खेळ केला आणि ७९व्या मिनिटाला जॉर्डनने गोल करून त्यांनी संजीवनी दिली. व्हिलाने पिछाडी १-२ अशी कमी केली. त्यानंतर सामन्यात बरोबरी साधण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. ९०व्या मिनिटाला केनने गोल करून हॉटस्परचा ३-१ असा विजय निश्चित केला. या विजयासह हॉटस्परने ११ सामन्यांत २० गुणांची कमाई केली असून ते पाचव्या स्थानावर आले आहेत. मँचेस्टर युनायटेड २१ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत, तर मँचेस्टर सिटी (२५), आर्सेनल (२५) आणि लेईचेस्टर (२२) अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

Story img Loader