इन्चॉन येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताच्या २३-वर्षांखालील पुरुषांच्या संघाचा जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरातीसह ग-गटात समावेश करण्यात आला आहे. याचप्रमाणे भारताच्या वरिष्ठ महिला संघाचा अ-गटात समावेश करण्यात आला असून, या गटात यजमान दक्षिण कोरिया, थायलंड आणि मालदीव हे अन्य संघ आहेत. पुरुषांच्या विभागात २९ देशांचा सहभाग असून, हे संघ आठ गटांमध्ये विभागण्यात आले आहेत. यापैकी पाच गटांत चार संघांचा, तर तीन गटांत तीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. महिलांच्या विभागात ११ संघ सहभागी होणार असून, दोन गटांत चार संघांचा आणि एका गटात तीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. दोन वेळा आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताने २०१२मध्ये मस्कट येथे झालेल्या आशियाई फुटबॉल चषक (२२ वर्षांखालील) पात्रता स्पध्रेत संयुक्त अरब अमिरातीला बरोबरीत रोखले होते. याचप्रमाणे २०१०च्या गुवांगझाऊ आशियाई क्रीडा स्पध्रेत संयुक्त अरब अमिरातीने रौप्यपदक जिंकले होते. भारताचा महिलांचा संघ १९९८नंतर प्रथमच आशियाई क्रीडा स्पध्रेत सहभागी होत आहे. त्यावेळी भारताला चीन, चायनीज तैपेई आणि दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळवता आला नव्हता. १७व्या आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत रंगणार असून, फुटबॉल स्पर्धेला मात्र १४ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

Story img Loader