धडधाकट असलेली माणसं छोट्या छोट्या अडचणींनी खचून जातात. परिस्थितीसमोर गुडघे टेकतात. पण काही लोक अशी असतात जी कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. हे लोक प्रतिकूल परिस्थितीशी चिवट संघर्ष करून एक आदर्श निर्माण करतात. जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमधील ३४ वर्षीय आमिर हुसैन लोनची अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे. आमिर हुसैनला जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचे कर्णधार पद देण्यात आले आहे. खांद्यापासून दोन हात नसलेला आमिर आपल्या अनोख्या शैलीत क्रिकेट खेळतो. त्याची ही शैली क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमिर हुसैन लोन याला जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेने त्याच्या संघर्षगाथेवर एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये तो फलंदाजी आणि गोलंदाजी करताना दिसतो. २०१३ साली आमिरच्या शिक्षकाने त्याला क्रिकेट खेळताना पाहिले. दोन्ही हात नसतानाही आमिरची क्रिकेट खेळण्याची जिद्द आणि त्याच्यातले कौशल्य पाहून त्याला पॅरा क्रिकेटची ओळख करून दिली.

आमिर हुसैन गळा आणि खांद्यात बॅट धरून फलंदाजी करतो आणि पायाच्या अंगठा आणि इतर बोटांच्या चिमटीत बॉल धरून पायाने गोलंदाजी करतो. हे शब्दात सांगताना आपल्याला सहजा सहजी यावर विश्वास बसणार नाही. पण आमिरच्या क्रिकेट कौशल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वच क्रिकेट चाहत्यांना त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही.

१९९७ साली आमिर हुसैन लोन केवळ आठ वर्षांचा असताना एका अपघातात त्याला दोन्ही हात गमवावे लागले. काश्मीर न्यूज ऑब्जर्व्हर या वृत्तसंस्थेसी बोलताना आमिरने सांगितले की, लहान असताना तो वडीलांच्या लाकूड कापण्याच्या कारखान्यात डबा द्यायला गेला होता. त्यावेळी कारखान्यातील यंत्रामध्ये त्याचे जॅकेट अडकल्यामुळे त्याचा अपघात झाला. आपल्या मुलाला दोन्ही हात गमवावे लागल्यामुळे वडील बशीर अहमद लोण यांनी नंतर कारखानाच बंद करून टाकला. तरीही त्याने हार न मानता क्रिकेट खेळण्याची उमेद सोडली नाही. त्याने क्रिकेट खेळण्यासाठी स्वतःची शैली विकसित केली.

ग्रेटर काश्मीर न्यूजशी बोलताना आमिर म्हणतो की, मला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. सचिन तेंडुलकरचा खेळ बघून मीही प्रेरित झालो होतो. त्याच्यासारखेच आपल्या देशासाठी खेळावे, असे माझे स्वप्न होते. पण अपघातामुळे माझ्या स्वप्नांना नख लागले. मात्र माझ्या आजीने मला उमेद दिली. एकदा आजीने माझ्या दिशेने चेंडू फेकला आणि मी आनंदून गेलो. आजी आणि मी पुन्हा पुन्हा हा खेळ खेळायचो. त्यातूनच मला फलंदाजी करण्याची नवी कल्पना गवसली.

डिसेंबर २०२३ मध्ये आमिर हुसैनला “सा रे ग म पा” या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. यावेळी त्याची प्रेरणादायी आणि संघर्षमय कहाणी ऐकूनच सर्वच जण थक्क झाले. यावेळी अभिनेता विकी कौशल सॅम बहादुर या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या ठिकाणी आला होता. त्याने क्रिकेटर आमिर हुसैनच्या जीवनावर बायोपिक बनल्यास त्यात आमिरची भूमिका साकारण्यास आनंद वाटेल, असे सांगितले.

दोन वर्षांपूर्वी पिकल एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन कंपनीने आमिर हुसैनच्या बायोपिकची घोषणा केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tragedy to triumph differently abled amir lones inspirational journey to cricket stardom kvg
Show comments