India vs Australia 2023 2nd ODI Match Updates in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु झाली असून आज विशाखा पट्टणममध्ये दुसरा सामना खेळवण्यात आला. पहिल्या सामन्यात भारताने विजयाची माळ गळ्यात घातल्यानंतर ऑस्ट्रेलियानेही जशाच तसं उत्तर दिलं आहे. आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर एकतर्फी विजय मिळवला. मिचेल स्टार्कच्या वेगवान माऱ्यामुळं भारताला ११७ धावांवर मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११८ धावांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श आणि ट्रेविस हेडने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. ट्रेविस हेडने ३० चेंडूत ५१ आणि मिचेल मार्शने ३६ चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाने फक्त ११ षटकांत १२१ धावा करून विजयाचं लक्ष्य गाठलं. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांवर आटोपला होता. पण आजच्या सामन्यात मोहम्मह शामी, मोहम्मह सिराजला वेगवान मारा करूनही ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला बाद करता आलं नाही. अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवचीही मिचेल मार्श आणि ट्रेविस हेडने धुलाई केली. त्यामुळे ११ षटकात ऑस्ट्रेलियाने १२१ धावांची मजल मारत मालिकेतील दुसरा सामना खिशात घातला. ऑस्ट्रेलियाने दोनवेळा भारताला १० विकेट्सने पराभूत केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने या सामन्यातही भेदक गोलंदाजी केली. भारताच्या चार फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवण्यात स्टार्क यशस्वी झाला. भारतासाठी सलामीला मैदानात उतरलेल्या शुबमन गिलला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार रोहित शर्माने १५ चेंडूत १३ धावा केल्या. रोहित आणि शुबमन दोघेही स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
विराटने ३५ चेंडूत ३१ धावा केल्या. तसंच सूर्यकुमार यादव या सामन्यातही शून्यावर बाद झाला. मागील सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा के एल राहुल आजच्या सामन्यात फक्त ९ धावा करून माघारी परतला. हार्दिक पांड्यालाही धावांचा सूर गवसला नाही. हार्दिक एक धाव करून तंबूत परतला. त्यानंतर जडेजाने डाव सावरत १६ धावा केल्या. पण त्यालाही भारताच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवता आला नाही.