अश्विनच्या फिरकीचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रेव्हिस हेड याने त्याचा दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाचा जुना सहकारी हॅरी निल्सन याच्याकडून फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा सामना करण्यासाठी सल्ला मागणार असल्याचे म्हटले आहे. भारताविरुद्ध ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याच्याशी चर्चा करणार असल्याचे ट्रेव्हिसने सांगितले.

पाहुण्या भारताच्या संघाविरुद्ध खेळताना दक्षिण ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज निल्सनने शतकी खेळी केली होती. त्या सराव सामन्यात त्याने अश्विनच्या फिरकीचा अत्यंत समर्थपणे सामना केल्याने त्याच्याशी या विषयावर चर्चा करण्याचे मी ठरवले आहे, असे ट्रेव्हिसने नमूद केले.

अश्विनने डावखुऱ्या फलंदाजांवर नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. त्यात ऑस्ट्रेलियाच्या विद्यमान संघात किमान ४ फलंदाज डावखुरे आहेत. त्यामुळे अश्विनला हाताळणे हे त्यांच्यापुढे आव्हान राहणार आहे. ‘‘आमचे फलंदाज हे अश्विनची गोलंदाजी खेळण्यास सक्षम आहेत. मीसुद्धा अश्विनविरुद्ध आयपीएल सामन्यांमध्ये दोनदा खेळलो आहे. परंतु त्या वेळी फार काळ संधी मिळाली नव्हती. तसेच कसोटी सामन्यात त्याच्याविरुद्ध खेळण्याचाही अनुभव माझ्याकडे नाही,’’ असेही ट्रेव्हिसने सांगितले.

Story img Loader