Trent Boult Unique Record in T20 Leagues : न्यूझीलंडचा महान वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने जगातील सर्वात अनोखा विक्रम रचला आहे. ट्रेंट बोल्टचे नाव आता इतिहासाच्या पानांवर नोंदवले गेले आहे. ट्रेंट बोल्ट हा एकाच फ्रँचायझीच्या चार वेगवेगळ्या संघांसह चार टी-२० विजेतेपद जिंकणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. ट्रेंट बोल्टने शनिवारी हा मोठा पराक्रम केला, जेव्हा त्याच्या एमआय केपटाऊनने त्यांचे पहिले एसए२० जेतेपद पटकावले. एसए२० २०२५ च्या अंतिम सामन्यात एमआय केपटाऊनने सनरायझर्स ईस्टर्न केपचा ७६ धावांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले.
ट्रेंट बोल्टने केला जगातील सर्वात अनोखा विक्रम –
ट्रेंट बोल्ट हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता, ज्याने २०२० मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. ट्रेंट बोल्टने २०२३ मध्ये एमआय न्यू यॉर्कसह मेजर लीग क्रिकेट मध्ये जेतेपद, २०२४ मध्ये एमआय एमिरेट्ससह इंटरनॅशनल लीग टी-२० मध्ये आणि शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी एमआय केपटाऊनसह एसए२० विजेतेपद जिंकले. यासह, ट्रेंट बोल्ट एकाच फ्रँचायझीच्या चार वेगवेगळ्या संघांसह चार टी-२० जेतेपद जिंकणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
ट्रेंट बोल्टने घातला धुमाकूळ –
शनिवारी एमआय केपटाऊनच्या जेतेपदात ट्रेंट बोल्टने महत्त्वाची भूमिका बजावली. एसए२० च्या २०२५ च्या अंतिम सामन्यात ट्रेंट बोल्टने सनरायझर्स ईस्टर्न केपविरुद्ध घातक गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत फक्त ९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. एसए२० च्या २०२५ अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ट्रेंट बोल्टला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. यावर्षी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात ट्रेंट बोल्टला मुंबई इंडियन्सने १२.५० कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
एसए२० २०२५ मध्ये बोल्टने घेतल्या ११ विकेट्स –
ट्रेंट बोल्टने एसए२० २०२५ मधील ११ सामन्यांमध्ये २४.०० च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या आहेत. ट्रेंट बोल्टने न्यूझीलंडसाठी ७८ कसोटी सामन्यांमध्ये २७.५ च्या सरासरीने ३१७ विकेट्स घेतल्या आहेत, तर ११४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २४.३९ च्या सरासरीने २११ विकेट्स घेतल्या आहेत. ट्रेंट बोल्टने ६१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २१.४३ च्या सरासरीने ८३ विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट हा न्यूझीलंडचा सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक आहे. गेल्या वर्षी या धडाकेबाज गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.