केदार जाधव याने झळकाविलेले कारकिर्दीतील पहिलेच त्रिशतक तसेच त्याने कर्णधार रोहित मोटवानी याच्या साथीत केलेल्या त्रिशतकी भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात ५ बाद ७३८ असा धावांचा डोंगर रचला. मोटवानी यानेही नाबाद शतक टोलविले.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यातील दुसराही दिवस महाराष्ट्राच्याच फलंदाजांचा ठरला. काल नाबाद शतक टोलविणाऱ्या जाधवने अंकित बावणे याच्या साथीत २३१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने मोटवानीच्या साथीत उत्तर प्रदेशच्या दिग्गज गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्रिशतकी भागीदारी केली. रणजीमधील पहिलेच त्रिशतक टोलविताना जाधवने ३२७ धावा केल्या. मोटवानी याने कर्णधारपदास साजेसा खेळ करीत नाबाद १४६ धावा केल्या. सामन्याचे अजून दोन दिवस बाकी असल्यामुळे उद्या सकाळी डाव घोषित करीत उत्तर प्रदेशवर दडपण ठेवण्याचा महाराष्ट्राचा प्रयत्न राहील.
जाधव व बावणे यांनी ३ बाद ३३९ धावसंख्येवर महाराष्ट्राचा पहिला डाव पुढे सुरू केला. बावणेने १३ चौकारांसह ७८ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या मोटवानी याने जाधवच्या साथीत चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी उत्तर प्रदेशच्या अनुभवी गोलंदाजांना निष्प्रभ केले. त्यांनी ३२२ मिनिटांत ३१४ धावांची भागीदारी करीत संघास भक्कम स्थितीत नेले. आजचा खेळ संपण्यापूर्वी थोडा अवधी बाकी असताना जाधव याला बाद करण्यात चावला यशस्वी ठरला. जाधवने ५२४ मिनिटांचा खेळ करीत ३२७ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ५४ चौकार व दोन षटकार अशी आतषबाजी केली. मोटवानी याने २१ चौकारांसह नाबाद १४६ धावा केल्या. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ६३.५ षटकांत ३१४ धावांची भागीदारी केली.
उत्तर प्रदेशकडून चावला सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन बळी घेतले मात्र त्यासाठी त्याला तब्बल २३३ धावा मोजाव्या लागल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा