पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताची आघाडीची तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबूवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीने चार वर्षांची बंदी घातली आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या चाचणीत ऐश्वर्याने ‘ओस्टारीन’ या बंदी घातलेल्या उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले होते.
ऐश्वर्याला १३ फेब्रवारी रोजी ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीकडून बंदीचे पत्र मिळाले होते. या बंदीला आव्हान देण्यासाठी तिच्याकडे ६ मार्चपर्यंतचा कालावधी आहे.

२५ वर्षीय ऐश्वर्या गेल्या वर्षी बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार होती, परंतु जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) बंदी घातलेले उत्तेजक द्रव्य शरीरात आढळल्याने ऐश्वर्या आणि धावपटू एस. धनलक्ष्मी यांना राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय चमूतून वगळण्यात आले होते.

गेल्या वर्षी १३ व १४ जूनला चेन्नई येथे झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान ऐश्वर्याची चाचणी घेण्यात आली होती. या स्पर्धेत ऐश्वर्याने तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदकाची कमाई करतानाच १४.१४ मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रम रचला होता. उत्तेजक सेवनात दोषी आढळल्यामुळे गेल्या वर्षी जुलैमध्येच ऐश्वर्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे चार वर्षांच्या बंदीपैकी तिचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Triple jumper aishwarya babuvar banned for four years amy