वृत्तसंस्था, मेलबर्न : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्राथमिक फेरीपासून दुबळय़ा संघांनी सनसनाटी निकाल नोंदवले असले, तरी बुधवारी इंग्लंड-आयर्लंड दरम्यानच्या सामन्यात अशा निकालाची अपेक्षा नाही. या सामन्यात इंग्लंडचेच पारडे जड राहील यात शंका नाही. अर्थात, हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे सामन्यावर पावसाचे ढगही असतील.

अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार विजय मिळवून इंग्लंडने आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात केली आहे. सॅम करनच्या उत्तरार्धातील गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांचे काम सोपे केले होते. अशीच कामगिरी बुधवारीही इंग्लंडचे गोलंदाज करतील. तरी, त्यांच्या आघाडीच्या चार फलंदाजांना धावा कराव्या लागतील. सलामीच्या लढतीत या आघाडीवर त्यांना अपयश आले. अखेरच्या टप्प्यात लियाम लिव्हिंगस्टोनने केलेल्या फलंदाजीने इंग्लंडचा विजय साकार केला होता.

सामन्याच्या पूर्वसंध्येला इंग्लंड कर्णधार जोस बटलरने सामन्याच्या दिवशी असलेल्या परिस्थितीचा विचार करून सर्वोत्तम संघ खेळविण्याचा मानस असल्याचे सांगितले. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स आणि मार्क वूड यांचा समावेश तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. या दोघांना बदलण्याचा विचार झाल्यास इंग्लंडसमोर डेव्हिड विली आणि ख्रिस जॉर्डनचे पर्याय असतील.

आयर्लंडने प्राथमिक फेरीपासून संघात बदल केलेला नाही. या वेळीदेखील त्यांच्याकडून बदलाची शक्यता नाही. जॉर्ज डॉकरेल याने  करोनाबाधित असूनही सराव केला. त्यामुळे डॉकरेल इंग्लंडविरुद्ध खेळणार असल्याचे संकेत मिळाले. मेलबर्नच्या मैदानावर फलंदाजांची कसोटी लागेल यात शंका नाही. खेळपट्टीचा अंदाज घ्यायचा झाल्यास फलंदाजीस पूरक अशीच खेळपट्टी आहे. हवामान खात्याने दुपारी आणि संध्याकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने वेगवान गोलंदाजांना साथ मिळेल.

Story img Loader