पीटीआय, मेलबर्न
इंग्लंडच्या मर्यादित षटकांतील क्रिकेटच्या सुवर्णयुगाचा आणखी एक अध्याय रविवारी लिहिला गेला. डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करनचा (३/१२) भेदक मारा आणि दडपणाखाली आपला खेळ उंचावण्यासाठी ओळखला जाणाऱ्या बेन स्टोक्सच्या (४९ चेंडूंत नाबाद ५२ धावा) अर्धशतकामुळे इंग्लंडने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच गडी राखून मात करत दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तसेच या विश्वविजयासह इंग्लंडने नवा इतिहासही रचला. एकाच वेळी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक आपल्याकडे बाळगणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
हेही वाचा- ICC T20 World Cup: “भारताने त्यांच्याकडून काहीतरी शिकावं”; माजी क्रिकेटपटूचा भारतीय संघाला सल्ला
इंग्लंडने २०१९मध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. हा अनुभव यंदा त्यांच्या कामी आला. पाकिस्तानचा संघ १९९२च्या विश्वचषक विजयाची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक होता. मात्र, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) झालेल्या अंतिम सामन्यात बाबर आझमचा पाकिस्तान संघ २० षटकांत ८ बाद १३७ धावाच करू शकला. त्यांच्या गोलंदाजांनी इंग्लंडला या धावा करण्यासाठी झुंजवले. मात्र, अखेरीस २०१९च्या विश्वचषकाप्रमाणे डावखुऱ्या स्टोक्सच्या निर्णायक योगदानामुळे इंग्लंडला विजय मिळवणे शक्य झाले. इंग्लंडने १३८ धावांचे लक्ष्य १९ षटकांत गाठले आणि २०१० नंतर दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले.
‘एमसीजी’वर झालेल्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट होते. मात्र, पावसाने व्यत्यय आणला नाही. परंतु ढगाळ वातावरण आणि हिरवीगार खेळपट्टी लक्षात घेऊन इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी िस्वगचा चांगला वापर करत पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांना सतावले. डावाच्या पाचव्या षटकात करनने रिझवानला (१४ चेंडूंत १५) माघारी पाठवले.
त्यानंतर लेग-स्पिनर आदिल रशीदने बाबर (२८ चेंडूत ३२) आणि मोहम्मद हॅरिस (१२ चेंडूंत ८) यांना बाद करत पाकिस्तानला अडचणीत टाकले. तसेच इफ्तिकार अहमदला खातेही उघडता आले नाही. यानंतर डावखुरा शान मसूद (२८ चेंडूंत ३८) आणि शादाब खान (१४ चेंडूंत २०) यांनी संयमाने फलंदाजी करून पाकिस्तानला शंभरीचा टप्पा ओलांडून दिला. मात्र, करनने मसूदला, तर ख्रिस जॉर्डनने शादाबला माघारी धाडल्याने पाकिस्तानचा डाव ८ बाद १३७ धावांवर मर्यादित राहिला.
प्रत्युत्तरात, पाकिस्तानच्या गोलंदाजांनीही आपली गुणवत्ता दाखवली. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात ॲलेक्स हेल्सला (१) बाद केले. तसेच हॅरिस रौफने फिल सॉल्ट (९ चेंडूंत १०) आणि कर्णधार जोस बटलर (१७ चेंडूंत २६) यांना माघारी पाठवले. त्यामुळे इंग्लंडची ३ बाद ४५ अशी स्थिती झाली. मात्र, स्टोक्सने संयम बाळगला. त्याने एक-दोन धावांवर भर दिला. त्यानंतर अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून त्याने इंग्लंडला विजय मिळवून दिला. स्टोक्सने नाबाद ५२ धावांच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार मारला. त्याला हॅरी ब्रूक (२३ चेंडूंत २०) आणि मोईन अली (१२ चेंडूंत १९) यांची चांगली साथ लाभली.
आफ्रिदीच्या दुखापतीचा फटका?
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजाना वेगाने धावा करण्यापासून रोखले होते. इंग्लंडला विजयासाठी अखेरच्या ३० चेंडूंत ४१ धावांची आवश्यकता होती. १६वे षटक टाकण्याची जबाबदारी शाहीन शाह आफ्रिदीवर होती. आफ्रिदीला त्यापूर्वी हॅरी ब्रूकचा झेल पकडताना पायाला दुखापत झाली होती. मात्र, त्याने गोलंदाजी करण्याचे धाडस दाखवले, पण तो केवळ एक चेंडू टाकू शकला. या षटकातील उर्वरित पाच चेंडू ऑफ-स्पिनर इफ्तिकार अहमदने टाकले. त्याच्या अखेरच्या दोन चेंडूंवर स्टोक्सने अनुक्रमे चौकार व षटकार मारला. त्यामुळे इंग्लंडच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.१ इंग्लंडने २०१९चा एकदिवसीय आणि यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला. त्यामुळे एकाच वेळी मर्यादित षटकांचे दोन्ही विश्वचषक आपल्याकडे बाळगणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
२इंग्लंडला दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यात यश आले. ही कामगिरी करणारा इंग्लंड हा वेस्ट इंडिजनंतरचा केवळ दुसरा संघ ठरला. इंग्लंडने यापूर्वी २०१०मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते.२यष्टीरक्षक आणि कर्णधार अशी दुहेरी भूमिका बजावताना आपल्या संघाला विश्वचषक जिंकवून देणारा जोस बटलर हा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी भारताच्या महेंद्रसिंह धोनीने (२००७चा ट्वेन्टी-२० व २०११चा एकदिवसीय विश्वचषक) हा पराक्रम केला होता.\२पाकिस्तानचा संघ दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. यापूर्वी केवळ श्रीलंकेला (२००९ व २०१२) दोन वेळा अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली होती.