निर्णायक सामन्यात, मोक्याच्या क्षणी कामगिरी खालावणे आणि जागतिक स्पर्धेच्या जेतेपदापासून वंचित राहावे लागणे हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा आजवरचा इतिहास आहे. याचाच प्रत्यय ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी आला. तुलनेने दुबळय़ा नेदरलँड्सविरुद्ध विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश, असे सहजसोपे समीकरण दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर होते. मात्र, दडपणाखाली आफ्रिकेच्या संघाचा खेळ खालावला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले, तर पाकिस्तानलाही आगेकूच करण्याची संधी निर्माण झाली. त्यांनी या संधीचे सोने केले. पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले. मग ‘अव्वल १२’ फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवत ‘गट-२’ मध्ये अग्रस्थान पटकावले.
सूर्यकुमारच्या झंझावातामुळे झिम्बाब्वेवर मात
सूर्यकुमार यादव (२५ चेंडूंत नाबाद ६१ धावा) आणि केएल राहुल (३५ चेंडूंत ५१ धावा) यांच्या अर्धशतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या (२२ धावांत ३ बळी) फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीतील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवत आपल्या गटात अग्रस्थानी राहत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेलबर्नमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या १८७ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही. वेस्ले मधेवेरे आणि रेजिस चकाब्वा यांना भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार क्रेग एर्विन (१३) आणि सीन विल्यम्स (११) यांनीही डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. यानंतर सिकंदर रझा (३४ धावा) आणि रायन बर्ल (३५) यांनी संघाच्या धावसंख्येत भर घातली. त्यांनाही अधिक काळ मैदानात टिकाव धरता आला नाही. त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ १७.२ षटकांत ११५ धावसंख्येवर आटोपला. भारताकडून अश्विनला मोहम्मद शमी (२/१४) आणि हार्दिक पंडय़ा (२/१६) यांची साथ लाभली.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्माकडून (१५) सर्वाना मोठय़ा खेळीची अपेक्षा होती, मात्र त्याने या सामन्यातही निराश केले. यानंतर राहुल आणि विराट कोहली (२६ धावा) यांनी दुसऱ्या गडीसाठी भागीदारी रचत भारताला सुस्थितीत पोहोचवले. कोहली बाद झाल्यानंतर राहुलने अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि तितकेच षटकार लगावले. राहुल माघारी परतल्यानंतर संघात स्थान मिळालेल्या ऋषभ पंतलाही (३) चमक दाखवता आली नाही. सूर्यकुमारने दुसऱ्या बाजूने फटक्यांची आतषबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार झळकावले. त्याला हार्दिक पंडय़ाने (१८) साथ दिली. त्यामुळे भारताला २० षटकांत ५ बाद १८६ धावसंख्येपर्यंत पोहोचता आले. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने (२/९) गोलंदाजीत योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ५ बाद १८६ (सूर्यकुमार यादव नाबाद ६१, केएल राहुल ५१; सीन विल्यम्स २/९) विजयी वि. झिम्बाब्वे : १७.२ षटकांत सर्वबाद ११५ (सिकंदर रझा ३४, रायन बर्ल ३५; रविचंद्रन अश्विन ३/२२, हार्दिक पंडय़ा २/१६, मोहम्मद शमी २/१४)
आफ्रिदीचा भेदक मारा; बांगलादेशवर सरशी
शाहीन शाह आफ्रिदीच्या (२२ धावांत ४ बळी) गोलंदाजीनंतर मोहम्मद हारिस (१८ चेंडूंत ३१ धावा) आणि शान मसूद (१४ चेंडूंत नाबाद २४) यांच्या निर्णायक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीतील अखेरच्या सामन्यात बांगलादेशवर पाच गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली.
बांगलादेशने दिलेल्या १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने संयमी सुरुवात केली. सलामीवर मोहम्मद रिझवान (३२) आणि कर्णधार बाबर आझम (२५) यांनी पहिल्या गडय़ासाठी ५७ धावांची भागीदारी रचली. हे दोघेही बाद झाल्यानंतर संघाच्या अडचणीत भर पडली. मात्र, हारिस आणि मसूद यांनी धावसंख्येत भर घालणे सुरूच ठेवले आणि त्यामुळे १८.१ षटकांत पाकिस्तानने ५ बाद १२८ धावसंख्येपर्यंत मजल मारत विजय नोंदवला. रविवारी पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका नेदरलँड्सकडून पराभूत झाल्याने पाकिस्तानला हा सामना जिंकणे गरजेचे होते. या सामन्यात विजय मिळवल्याने त्यांना उपांत्य फेरी गाठता आली.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशने नजमुल हुसैन शंटोच्या (४८ चेंडूंत ५४ धावा) अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ८ बाद १२७ धावा केल्या. अफिफ हुसैन (नाबाद २४) आणि सौम्य सरकार (२०) वगळता इतर कोणाचीही साठ त्याला मिळाली नाही. आफ्रिदीला शादाब खान (२/३०) आणि हारिस रौफ (१/२१) यांची साथ लाभली.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : २० षटकांत ८ बाद १२७
(नजमुल शंटो ५४, अफिफ हुसैन नाबाद २४; शाहीन शाह आफ्रिदी ४/२२) पराभूत वि. पाकिस्तान : १८.१ षटकांत ५ बाद १२८ (मोहम्मद रिझवान ३२, मोहम्मद हारिस ३१; नसुम अहमद १/१४)