पीटीआय, मेलबर्न : आक्रमक शैलीत फलंदाजी करताना कामगिरीत सातत्य टिकवून ठेवणे अत्यंत अवघड असते. मात्र, सूर्यकुमार यादवने हे समीकरण साधले आहे. त्याची फलंदाजी पाहण्याचा आनंद वेगळाच असतो, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने मुंबईकर फलंदाजाचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंतच्या पाच सामन्यांत ७५च्या सरासरीने आणि १९३.९७च्या धावगतीने २२५ धावा फटकावल्या आहेत. तसेच सूर्यकुमारने वैविध्यपूर्ण आणि कलात्मक फटक्यांच्या आतषबाजीने क्रिकेटरसिकांना, समालोचकांना आणि आपल्या संघातील सहकाऱ्यांनाही थक्क केले आहे. भारताचा प्रशिक्षक द्रविड खेळाडू म्हणून आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जायचा. सूर्यकुमारची फलंदाजीची शैली द्रविडपेक्षा पूर्णपणे भिन्न असली, तरी तो सूर्यकुमारच्या कामगिरीने प्रभावित झाला आहे.

‘‘सूर्यकुमार ज्या आक्रमकतेने आणि ज्या धावगतीने फलंदाजी करतो, त्यात कामगिरीमध्ये सातत्य टिकवणे अत्यंत अवघड असते. मात्र, सूर्यकुमारला आक्रमकता आणि सातत्य यांच्यात सांगड घालणे जमले आहे. तो अप्रतिम फलंदाजी करतो आहे. फलंदाजीदरम्यान आपल्याला काय करायचे आहे, हे त्याला ठाऊक आहे. त्याचे योगदान आमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते आहे. त्याची फलंदाजी पाहताना वेगळीच मजा येते,’’ असे द्रविड म्हणाला.

सूर्यकुमारच्या २५ चेंडूंतील नाबाद ६१ धावांच्या खेळीमुळे भारताने रविवारी ‘अव्वल १२’ फेरीतील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला होता. या खेळीदरम्यान सूर्यकुमारने पुन्हा एकदा सर्वाना थक्क करणारे फटके मारले. ‘‘सूर्यकुमारने मारलेल्या फटक्यांचे शब्दांत वर्णन करणे अवघड आहे. तो सध्या जगातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० फलंदाज का आहे, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले,’’ अशी प्रतिक्रिया द्रविडने व्यक्त केली.

‘‘सूर्यकुमारने आपल्या खेळावर खूप मेहनत घेतली आहे. फलंदाजीचा तासन्तास सराव, सतत क्रिकेटबाबत विचार करणे आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी घेतलेली मेहनत यामुळेच सूर्यकुमारला हे यश मिळते आहे. गेल्या काही वर्षांत सूर्यकुमारने आपल्या शरीराची ज्याप्रकारे काळजी घेतली आहे, ते फारच उल्लेखनीय आहे,’’ असेही द्रविडने नमूद केले.

सूर्यकुमारचे योगदान निर्णायक – गावस्कर

सूर्यकुमार नवा ‘मिस्टर ३६० डिग्री’ म्हणजे कोणताही चेंडू मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात मारण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात त्याचे योगदान भारतासाठी निर्णायक ठरते आहे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. ‘‘झिम्बाब्वेविरुद्ध सूर्यकुमारने एक षटकार यष्टिरक्षकाच्या डाव्या दिशेला मारला. त्यानंतर अखेरच्या षटकात त्याने गोलंदाजाच्या गतीचा वापर करून आपल्या मागील दिशेला चेंडू मारला. तो सर्व प्रकारे फटके मारण्यात सक्षम आहे. काही सामन्यांत त्याच्या योगदानाविना भारताला १४०-१५० धावांपर्यंत पोहोचणेही अवघड गेले असते,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

पंतची भूमिका महत्त्वाची – द्रविड

यष्टिरक्षक आणि डावखुरा फलंदाज ऋषभ पंतने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सुरुवातीचे सामने खेळले नसले, तरी आगामी सामन्यांत तो महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे संकेत द्रविडने दिले आहेत. उपांत्य फेरीत भारताची इंग्लंडशी गाठ पडेल. इंग्लंडच्या संघात लेगस्पिनर आदिल रशीदचा समावेश असून त्याच्याविरुद्ध पंतचे डावखुरेपण भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल. ‘‘झिम्बाब्वेविरुद्ध पंतला (३ धावा) अपयश आले असले, तरी आम्ही केवळ एका सामन्यावरून खेळाडूबाबत मत बनवत नाही. आम्हाला प्रतिस्पर्धी संघ आणि त्या संघातील गोलंदाजांचा विचार करून अंतिम ११ जणांची निवड करावी लागते. आम्हाला पंतवर पूर्ण विश्वास आहे,’’ असे द्रविड म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twenty 20 world cup cricket tournament joy watching suryakumar batting rahul dravid coach ysh