वृत्तसंस्था, अ‍ॅडलेड : इंग्लंडविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे भारतीय संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या. मात्र, खेळाडूंच्या भविष्याबाबत बोलण्याची ही योग्य वेळ नाही, असे भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्ट केले. ‘‘उपांत्य फेरीचा सामना आताच संपला आहे. त्यामुळे इतक्यातच आमच्या संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्याबाबत चर्चा करणे योग्य नाही. आम्ही पुढील विश्वचषकाच्या दृष्टीने आता संघबांधणीला सुरुवात करू,’’ असे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर द्रविड म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने ट्वेन्टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या. मात्र, कर्णधार रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक या वरिष्ठ खेळाडूंना छाप पाडता आली नाही. त्यामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील त्यांच्या भविष्याबाबत संभ्रम आहे. तसेच भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागणे निराशाजनक असल्याचे द्रविडने सांगितले. ‘‘आम्हाला अंतिम फेरी गाठायची होती. परंतु, इंग्लंडने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत आमच्यापेक्षा दर्जेदार खेळ केला. उपांत्य फेरीचा सामना असल्याने प्रथम फलंदाजी करून धावा फलकावर लावणे आम्हाला योग्य वाटले. यापूर्वीच्या सामन्यांत आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र, या सामन्याच्या सुरुवातीला आमच्या खेळाडूंना ही खेळपट्टी संथ असल्याचे वाटले. तरीही आम्हाला १८०-१८५ धावांची मजल मारता आली असती,’’ असे द्रविडने नमूद केले.

गोलंदाजांच्या कामगिरीने निराश – रोहित

इंग्लंडने एकही गडी न गमावता १६९ धावांचा यशस्वी पाठलाग केला. आमच्या गोलंदाजांना या सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही, असे भारताचा कर्णधार रोहित शर्माने मान्य केले. ‘‘अखेरच्या षटकांतील फटकेबाजीमुळे आम्हाला चांगली धावसंख्या उभारता आली. मात्र, गोलंदाजीत आम्ही निराशा केली. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. मात्र, त्यांनी १६ षटकांतच आवश्यक धावा केल्या. तसेच बाद फेरीच्या सामन्यांत दडपण हाताळणेही महत्त्वाचे असते. तुम्ही इतरांना दपडण कसे हाताळायचे हे शिकवू शकत नाही. आमच्या खेळाडूंना ‘आयपीएल’मध्ये महत्त्वाच्या सामन्यांत खेळण्याचा अनुभव आहे. मात्र, आज आम्ही अपेक्षित कामगिरी करू शकलो नाही,’’ असे रोहितने सांगितले.

संपूर्ण संघाची उत्कृष्ट कामगिरी -बटलर

आमच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि आम्ही विजय मिळवला, असे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला. ‘‘उपांत्य फेरीत दर्जेदार कामगिरीचे प्रत्येकच संघाचे लक्ष्य असते. आम्ही या सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. मात्र, आम्ही फार काळ या विजयाबाबत विचार करू शकत नाही. आम्हाला अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल,’’ असे बटलरने सांगितले. ‘‘पाकिस्तानचा संघ लयीत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांना नमवणे सोपे नसेल,’’ असेही बटलर म्हणाला.

बिग बॅश लीग अनुभवाचा इंग्लंडला फायदा!

इंग्लंडच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. हा अनुभव त्यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचे मत द्रविडने व्यक्त केले. ‘‘इंग्लंडचे बरेचसे खेळाडू ऑस्ट्रेलियातील स्पर्धेत खेळतात. या अनुभवाचा त्यांना या स्पर्धेत नक्कीच फायदा झाला आहे,’’ असे द्रविड म्हणाला. भारतीय खेळाडूंना परदेशातील स्पर्धामध्ये खेळण्यास निर्बंध आहे. याविषयी द्रविडने सांगतिले, ‘‘भारतीय खेळाडूंना परदेशातील स्पर्धामध्ये खेळणे आव्हानात्मक असते, कारण याच काळात मायदेशात क्रिकेट हंगाम सुरू असतो. त्यांना परदेशातील संधींना मुकावे लागते. मात्र, याबाबतचा निर्णय ‘बीसीसीआय’च्या हातात आहे.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twenty 20 world cup decide future of senior players rahul dravid ysh