एकाच वेळी एकदिवसीय विश्वचषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे विजेते म्हणून मिरवण्यासाठी इंग्लंडचा संघ उत्सुक आहे. इंग्लंडने २०१०मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. हे त्यांचे पहिले जागतिक जेतेपद ठरले होते. त्यातच २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकातील अपयशानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१९मध्ये मायदेशात झालेला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदासाठीही इंग्लंडला प्रबळ दावेदार मानले जाते आहे. मॉर्गन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने यंदाच्या स्पर्धेत इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळेल. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • बलस्थाने : इंग्लंडच्या संघात एकहाती सामने जिंकवून देऊ शकणाऱ्या खेळाडूंची मोठी संख्या आहे. कर्णधार बटलर, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन आणि सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स यांसारख्या तडाखेबंद फलंदाजांचा इंग्लंडच्या संघात समावेश आहे. जेसन रॉयची कामगिरी खालावल्याने हेल्ससाठी इंग्लंडच्या ट्वेन्टी-२० संघाची दारे खुली झाली. हेल्सने ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० स्पर्धा बिग बॅश लीगमध्ये ६० डावांत १८०० हून अधिक धावा केल्या आहेत. हा अनुभव आता इंग्लंडला फायदेशीर ठरू शकेल.
  • कच्चे दुवे : गेल्या काही काळात इंग्लंडच्या खेळाडूंना दुखापतींनी सतावले आहे. जॉनी बेअरस्टो आणि जोफ्रा आर्चर यांसारखे तारांकित खेळाडू दुखापतींमुळे यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार आहेत. या दोघांची इंग्लंडला प्रकर्षांने उणीव जाणवू शकेल. तसेच लिव्हिंगस्टोन आणि ख्रिस वोक्स यांनीही दुखापतींमुळेच अलीकडच्या काळात फारसे सामने खेळलेले नाहीत. मार्क वूड आणि आदिल रशीद यांचा अपवाद वगळता इंग्लंडच्या संघात सामन्याचे चित्र पालटतील अशा गोलंदाजांचा अभाव आहे.
  • जेतेपद : एकदा (२०१०)
  • गेल्या विश्वचषकातील कामगिरी : उपांत्य फेरी
  • संघ : जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, सॅम करन, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, रीस टॉपली, मार्क वूड.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twenty20 world cup contenders team england play win ysh