उपांत्य फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पाच धावांनी पराभव; हरमनप्रीत, जेमिमाच्या खेळी व्यर्थ

वृत्तसंस्था, केपटाऊन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Women Twenty20 World Cup Cricket कर्णधार हरमनप्रीत कौर (३४ चेंडूंत ५२ धावा) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (२४ चेंडूंत ४३) यांच्या झुंजार खेळींनंतरही भारताला गुरुवारी महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय महिला संघाचे जागतिक विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले.

भारताला या सामन्यात क्षेत्ररक्षणातील चुका, अखेरच्या षटकांत गोलंदाजांचा स्वैर मारा आणि फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद होणे याचा फटका बासला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला २० षटकांत ८ बाद १६७ धावापर्यंतच पोहोचता आले. शफाली वर्मा (९), उपकर्णधार स्मृती मनधाना (२) आणि यास्तिका भाटिया (४) झटपट माघारी परतल्याने भारताची ३ बाद २८ अशी स्थिती झाली. यानंतर जेमिमा व हरमनप्रीत यांनी चौथ्या गडय़ासाठी ६९ धावांची भागीदारी रचत भारताच्या आशा कायम ठेवल्या. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात जेमिमा बाद झाली. तिने आपल्या खेळीत सहा चौकार मारले. यानंतर हरमनप्रीतने रिचा घोषच्या (१४) साथीने भारताच्या धावसंख्येत भर घालणे सुरू ठेवले.

अर्धशतक झळकावल्यानंतर दुसरी धाव घेताना बॅट खेळपट्टीमध्ये अडकल्याने हरमनप्रीत धावचीत झाली. तेथूनच सामन्याचे चित्र पालटले. दीप्ती शर्मा (नाबाद २०) व स्नेह राणा (११) यांना अखेरच्या षटकांत मोठे फटके मारता आले नाहीत. त्यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीपासून वंचित राहिला.त्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर बेथ मूनी (३७ चेंडूंत ५४) व कर्णधार मेग लॅनिंग (३४ चेंडूंत नाबाद ४९) यांचे झेल सोडल्याचा भारताला फटका बसला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या सहा षटकांत ७३ धावा, तर अखेरच्या षटकात १८ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ४ बाद १७२ (बेथ मूनी ५४, मेग लॅनिंग नाबाद ४९, ॲश्ले गार्डनर ३१; शिखा पांडे २/३२) विजयी वि. भारत : २० षटकांत ८ बाद १६७ (हरमनप्रीत कौर ५२, जेमिमा रॉड्रिग्ज ४३; डार्सी ब्राउन २/१८, ॲश्ले गार्डनर २/३७)

जेमिमाच्या खेळीमुळे आम्हाला विजयाची संधी निर्माण झाली होती. त्यानंतर आम्हाला अशा प्रकारे पराभव पत्करावा लागेल असे वाटले नव्हते. मला अश्रू अनावर झाले, कारण मी ज्या प्रकारे धावचीत झाले ते अत्यंत दुर्दैवी होते. आम्हाला नशिबाची साथ लाभली नाही. आम्ही ऑस्ट्रेलियाला अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली याचे समाधान आहे. आम्ही या सामन्यातही काही सोपे झेल सोडले. निर्णायक सामन्यांमध्ये तुम्ही प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला बाद करण्याची प्रत्येक संधी साधली पाहिजे. त्यात आम्ही कमी पडलो. – हरमनप्रीत कौर

आजचा उपांत्य सामना
इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका
वेळ : सायं. ६.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twenty20 world cup cricket women india lost to australia by five runs in the semi final amy
Show comments