सिडनी : नेदरलँड्सविरुद्ध ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या प्रशिक्षक आणि साहाय्यकांनी सराव सत्रादरम्यान जलदगती गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध केएल राहुलच्या हालचालींमधील चुका दूर करण्यावर जोर दिला. तर, पाकिस्तानविरुद्ध अष्टपैलू चमक दाखवणाऱ्या हार्दिक पंडय़ाला थकवा दूर करण्यासाठी विश्राम देण्यात आला.
भारतीय संघाचा पुढील सामना गुरुवारी होणार असून पंडय़ाला महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी या लढतीत विश्रांतीही देऊ शकते. त्याच्या जागी दीपक हुडाला संधी देण्याचा पर्याय व्यवस्थापनाकडे आहे. हुडा कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यात सक्षम असून पॉवरप्लेच्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजीचा पर्यायही भारताला मिळेल. या सत्रात रविचंद्रन अश्विनला वगळता पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या सर्व गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली.