पीटीआय, जॉर्जटाऊन (गयाना)

कार्लोस ब्रेथवेटने सलग चार षटकार मारत वेस्ट इंडिजला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून दिल्याचे आजही प्रत्येक क्रिकेटप्रेमीला लक्षात आहे. मात्र, ब्रेथवेटच्या या अविस्मरणीय कामगिरीला आता आठ वर्षांहूनही अधिक काळ उलटून गेला आहे. त्यानंतर विंडीजचा संघ ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्ये फारशी चमक दाखवू शकलेला नाही. आता मायदेशात ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याचे विंडीजचे स्वप्न असून ते आज, रविवारी तुलनेने दुबळ्या पापुआ न्यू गिनीविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करतील. यावेळी दमदार सलामीचा विंडीजचा प्रयत्न असेल.

विंडीजच्या संघाने २०१२ आणि २०१६ असे सलग दोन वेळा ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारा विंडीज हा पहिलाच संघ ठरला होता. मात्र, त्यानंतर या संघाची कामगिरी खालावली. २०२१च्या स्पर्धेत अव्वल १२ संघांच्या फेरीत विंडीजला पाचपैकी चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २०२२ मध्ये विंडीजला मुख्य फेरीतही प्रवेश करता आला नव्हता. स्कॉटलंड आणि आयर्लंड यांच्याकडून पराभूत झाल्याने विंडीजवर प्राथमिक फेरीतच स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली होती. आता या कटू आठवणी पुसण्याचा विंडीज संघाचा मानस असेल.

हेही वाचा >>>Ind vs Ban: ऋषभ, हार्दिकची मुक्त फटकेबाजी; भारताचा बांगलादेशविरुद्ध ‘विजयी सराव’

विंडीजला दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी आता प्रशिक्षक म्हणून या संघाशी जोडला गेला आहे. सॅमी आणि कर्णधार रोव्हमन पॉवेल यांनी आपल्या खेळाडूंना आक्रमक शैलीतच खेळण्याची सूचना केली आहे. विंडीजने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल २५७ धावांची मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाकडे केवळ नऊ प्रमुख खेळाडू उपलब्ध होते. असे असले तरी विंडीजची कामगिरी अन्य संघांची चिंता वाढवणारी नक्कीच होती. आता पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सलामीच्या लढतीतही विंडीजकडून मोठ्या धावसंख्येचीच अपेक्षा केली जात आहे.

पापुआ न्यू गिनीची अष्टपैलूंवर मदार

असादोल्ला वालाच्या नेतृत्वाखालील पापुआ न्यू गिनी संघात तब्बल आठ अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज सेमा कामेआ आणि काबाऊ वागी मोरेआ यांनी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली होती. मोरेआने फिलिपिन्सविरुद्ध हॅटट्रिकही नोंदवली होती. मात्र, आता विंडीजच्या तडाखेबंद फलंदाजांसमोर या अननुभवी गोलंदाजांची कसोटी लागेल. पापुआ न्यू गिनीचा संघ २०२१ नंतर दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळणार आहे. त्या स्पर्धेत खेळलेले १० खेळाडू यंदाच्या संघातही आहेत. या अनुभवाचा फायदा पापुआ न्यू गिनी संघाला होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रसेलच्या कामगिरीवर नजर

वेस्ट इंडिजच्या संघात फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. जॉन्सन चार्ल्स आणि ब्रेंडन किंग विंडीजच्या डावाची सुरुवात करणे अपेक्षित आहे. मधल्या फळीची भिस्त निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि शेर्फेन रुदरफोर्ड यांच्यावर असेल. पूरन आणि पॉवेल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात फटकेबाज अर्धशतके साकारली होती. विजयवीर म्हणून आंद्रे रसेलच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल. रसेलने नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’मध्ये चांगली कामगिरी केली. आता विंडीजसाठी अष्टपैलू योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. विंडीजच्या गोलंदाजीची मदार रसेल, शमार जोसेफ आणि उपकर्णधार अल्झारी जोसेफ यांच्यावर असेल. त्यांच्याकडे गुदाकेश मोटीच्या रूपात गुणवान फिरकीपटू आहे.

नामिबियाचा ओमानशी सामना

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात नामिबिया आणि ओमान हे संघ समोरासमोर येणार आहेत. नामिबियाला २०२१ आणि २०२२ अशा सलग दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. गेल्या वर्षी आफ्रिकन पात्रता स्पर्धेत सहा सामने अपराजित राहत नामिबियाने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात प्रवेश मिळवला. दुसरीकडे, ओमानही २०१६ आणि २०२१ नंतर तिसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळणार आहे. त्यांनी आशियाई पात्रता स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. परंतु नामिबियाच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अधिक अनुभव असल्याने या सामन्यात त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

● वेळ : पहाटे ६ वा.