वृत्तसंस्था, मुंबई/नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून तब्बल चार दिवसांनंतर मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचे गुरुवारी दिमाखात स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईत लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत जंगी मिरवणूक आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सत्कार असा भारतीय संघाचा कार्यक्रम रंगला.

बार्बाडोस येथील वादळामुळे भारतीय संघाला चार दिवस तेथेच थांबावे लागले. त्यानंतर ‘बीसीसीआय’ने आयोजित केलेल्या विशेष विमानाने भारतीय संघाचे दिल्ली येथे गुरुवारी सकाळी आगमन झाले. खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले असल्याने कार्यक्रम थोडक्यात आटोपण्याची ‘बीसीसीआय’ची योजना होती. मात्र, दिल्ली येथे चाहत्यांचा उत्साह पाहिल्यानंतर भारतीय खेळाडूंचाही थकवा दूर झाला.

भारतीय संघाची बस दिल्लीत विमानतळावरुन हॉटेलमध्ये जाताना दुतर्फा चाहत्यांची गर्दी पहायला मिळत होती. त्यानंतर बस हॉटेलमध्ये पोहोचताच कर्णधार रोहित शर्मासह बहुतेक खेळाडूंनी भांगडा करत आनंद साजरा केला. हॉटेलमध्ये थोडा वेळ विश्रांती केल्यानंतर खेळाडू पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

हेही वाचा >>>‘मी हार्दिकची माफी मागते…’, टी-२० विश्वचषकानंतर लाइव्ह टीव्हीवर चाहतीने ‘त्या’ चुकीसाठी पंड्याला जोडले हात

पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान भारतीय संघाबरोबर ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांचीही उपस्थिती होती. पंतप्रधानांनी जवळपास दोन तास भारतीय संघाशी संवाद साधला आणि विश्वविजयापर्यंतच्या प्रवासाचे अनुभव विचारले. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची भेट आमच्यासाठी संस्मरणीय आणि सन्मानाची होती. पंतप्रधान निवासस्थानी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल तुमचे धन्यवाद,’’ असे विराट कोहलीने ‘इन्स्टाग्राम’वर लिहिले.

भारतीय संघ त्यानंतर मुंबईकडे येण्यासाठी निघाला. त्यांना दिल्लीवरून निघण्यास उशीर झाल्याने संघ जवळपास ५.३० च्या सुमारास मुंबईत दाखला झाल आणि त्यानंतर त्यांना कडक सुरक्षाव्यवस्थेत मरिन ड्राइव्ह येथे आणण्यात आले. मात्र, भारतीय संघाला नियोजित वेळेपेक्षा पोहोचण्यास बराच उशीर झाला असला, तरी चाहत्यांची गर्दी वाढतानाच दिसली.

२००७मध्ये अशाच पद्धतीने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची मिरवणूक निघाली होती. तेव्हा मुंबईकरांच्या प्रेमाने मी नि:शब्द झालो, असे धोनी म्हणाला होता. तोच उत्साह आणि तेच प्रेम आता रोहितच्या संघालाही मिळाले.

पावसाची हजेरी

भारतीय संघासह विश्वविजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी लाखो चाहते मरिन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर जमले होते. भारतीय संघाला मुंबईत दाखल होण्यासाठी उशीर झाल्याने चाहत्यांना थांबून राहावे लागले. या वेळी पावसानेही हजेरी लावली. परंतु चाहत्यांची गर्दी किंवा त्यांचा उत्साह कमी झाला नाही.

पंतप्रधानांचा खेळाडूंशी मनमोकळा संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्णधार रोहित शर्माला ‘माती कशी लागते?’ असा प्रश्न गमतीत विचारला. अंतिम सामन्यानंतर रोहितने बार्बाडोस येथील मैदानाचे गवत खात या स्टेडियमचे आभार मानले होते. तसेच अंतिम लढतीत निर्णायक अर्धशतक करणाऱ्या विराट कोहलीला ‘तुझ्या मनात काय विचार सुरू होते,’ असे विचारले.

विशेष जर्सी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाची भेट घेतली. त्यानंतर ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांनी ‘नमो’ असे लिहिलेली भारतीय संघाची विशेष जर्सी पंतप्रधानांना भेट दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twenty20 world cup winning indian team welcomed in mumbai amy
Show comments