कर्णधार स्टुअर्ट बिन्नी आणि यष्टीरक्षक मुरलीधरन गौतम यांनी झळकावलेल्या शानदार शतकांच्या जोरावर कर्नाटकने महाराष्ट्राविरुद्ध ४ बाद ३०६ अशी मजल मारली. चांगल्या सुरुवातीचे पुण्याचा कर्णधार रोहित मोटवानीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल आणि रॉबिन उथप्पाला बाद करत गोलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर कुणाल कपूर आणि मुरलीधरन गौतम यांनी संयमी भागीदारी करत डाव सावरला. सत्यजित बच्चावने कपूरला बाद केले.
गणेश सतीश धावबाद झाल्याने कर्नाटकची अवस्था ४ बाद ९१ अशी झाली. मात्र त्यानंतर गौतम आणि बिन्नी यांनी पाचव्या विकेटसाठी २१५ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राच्या गोलंदाजांना नामोहरम केले. दोघांनीही शतक साजेर करत कर्नाटकला पहिल्या दिवसअखेर तीनशेचा टप्पा ओलांडून दिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा गौतम १५ चौकार आणि एका षटकारासह १३२ तर बिन्नी १३ चौकार आणि २ षटकारांसह ११५ धावांवर खेळत आहे. महाराष्ट्रातर्फे श्रीकांत मुंढे, सचिन चौधरी आणि सत्यजित बच्चाव यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.