मुंबईच्या गोलंदाजांवर मध्य प्रदेशच्या ओझापुढे शतश: नमन करण्याची पाळी आली. आपल्या दमदरा दीडशतकी खेळीच्या जोरावर ओझाने मध्य प्रदेशला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. शतकवीर देवेंद्र बुंदेलाने कर्णधाराला साजेशी खेळी साकारत ओझाला चांगली साथ दिली आणि त्यांना तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद ५३८ अशी मजल मारता आली. मध्य प्रदेशने पहिल्या डावात १३४ धावांची आघाडी घेतली असून त्यांचे तीन फलंदाज अजूनही बाकी आहेत.
पहिल्या सत्रात ओझा आणि बुंदेला या जोडीने सुरेख फलंदाजी केल्यामुळे मुंबईला एकही बळी मिळवता आला नाही. या दोघांनी ३ बाद २२१ वरून दिवसाची सुरुवात केली आणि उपाहारापर्यंत संघाला ३ बाद ३१२ अशी मजल मारून दिली. दुसऱ्या सत्रात मात्र ओझा आणि बुंदेला यांना बाद करण्यात मुंबईला यश आले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २५८ धावांची दमदार भागीदारी रचली. ओझाने या वेळी १९ चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर १५५ धावांची खेळी साकारली, तर बुंदेलाने १४ चौकार आणि एक षटकार लगावत ११५ धावा केल्या. हरप्रीत सिमंगने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६७ धावा फटकावत संघाच्या धावसंख्येत वाढ केली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ४०४ विरुद्ध मध्य प्रदेश (पहिला डाव) : १६२ षटकांत ७ बाद ५३८ (नमन ओझा १५५, देवेंद्र बुंदेला ११५, इक्बाल अब्दुल्ला ३/१२३).