भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज गौतम गंभीर याने सर्व फॉरमॅट्समधून निवृत्ती जाहीर केली आहे. यासोबतच गौतम गंभीरचं क्रिकेट करिअर संपलं आहे. यापुढे खेळत राहण्याची उमेद संपल्यानेच तसंच आता थांबण्याची वेळ आली असल्याने आपण क्रिकेटला रामराम ठोकत असल्याचं गौतम गंभीरने सांगितलं आहे. गौतम गंभीरने आपला निर्णय जाहीर करताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आठवणी शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. #ThankYouGambhir असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

2016 मध्ये राजकोटमधील कसोटी सामन्यात गौतम गंभीर भारतीय संघातून अखेरचा खेळला होता. गौतम गंभीरने आपल्या करिअरमध्ये 58 कसोटी सामने खेळले. कसोटी कारकिर्दीत 41.95 च्या सरासरीने गंभीरने एकूण 4154 धावा केल्या. यामध्ये 9 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. गंभीर एकूण 147 एकदिवसीय सामने खेळला. यामध्ये त्याने 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या. गंभीरचा स्ट्राइक रेट 85.25 होता.

गंभीर एकूण 37 टी-20 सामने खेळला. टी-20 सामन्यांमध्ये गंभीरने 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या. यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश आहे.

टी-20 आणि एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकण्यात गंभीरचा मोलाचा वाटा होता. 2007 मधील वर्ल्ड टी-20 फायनलमध्ये गंभीरने सर्वात जास्त 75 धावा केल्या होत्या. भारताने पाच धावांनी सामना जिंकत पाकिस्तानचा पराभव केला होता. 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप फायनलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गंभीरने 97 धावा केल्या होत्या. सोबतच कर्णधार धोनीसोबत मॅच विनिंग पार्टनरशिप केली होती.

Story img Loader