ब्राझीलमध्ये १२ जून ते १३ जुलैदरम्यान होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी नवी दिल्लीतील दोन मुलांची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. अदिदासचा सदिच्छादूत केव्हिन पीटरसनने ५०० मुलांमधून सेंट कोलंबा शाळेचा मिहिर बात्रा आणि मदर्स इंटरनॅशनल स्कूलचा जसेन मोसेस यांची निवड केली. आता हे दोघे साव पावलो येथे १ जुलै रोजी रंगणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी ध्वजवाहकाच्या भूमिकेत असतील.
फुटबॉलच्या महासोहळ्यासाठी या दोघांसह अन्य चार जणांची निवड याआधीच करण्यात आली आहे. हे सर्व जण बाद फेरीच्या सामन्यांसाठी ध्वजवाहक म्हणून काम पाहतील. ‘‘फुटबॉलची पंढरी असलेल्या ब्राझीलमध्ये जाऊन प्रत्यक्ष विश्वचषकाचा सामना पाहणे, हा प्रत्येक चाहत्यासाठी संस्मरणीय क्षण असणार आहे. या मुलांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे,’’ असे पीटरसनने सांगितले.

Story img Loader