Records In IPL History : आयपीएलमध्ये ६ चेंडूत ६ चौकार ठोकण्याचा विक्रम भारताच्या पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावावर आहे. दोघांनीही आयपीएलमध्ये एकाच षटकात ६ चौकार मारण्याचा पराक्रम केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये जगभरातील क्रिकेटर सहभाग घेत असतात. अशातच सहा चेंडूत सहा चौकार ठोकणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नसतं. टी-२० क्रिकेटमध्ये नेहमीच आक्रमक फलंदाजांचा दबदबा राहिला आहे. ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्रे रसलसारख्या स्फोटक फलंदाजांनी मैदानात चौकार षटकारांचा पाऊस पाडत क्रिकेट चाहत्यांचं जबरदस्त मनोरंजन केलं आहे. या फलंदाजांच्या लिस्टमध्ये पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांनीही नाव कोरलं आहे.
आयपीएल २०१२ च्या १८ व्या सामन्यात अजिंक्य रहाणेनं हा कारनामा केला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगला होता. राजस्थान रॉयल्ससाठी अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविडने ६२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर ओवेश शाह मैदानात उतरल्यावर राजस्थानसाठी १२१ धावांची भागिदारी रचली होती. या सामन्यात अजिंक्य रहाणेने श्रीनाथ अरविंदच्या गोलंदाजीवर सहा चेंडूत सहा चौकार मारले.
पहिल्या चेंडूवर रहाणेनं आक्रमक फटका मारला अन् थेट चौकार गेला. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरही रहाणेनं चौकार लगावला. रहाणेनं मारलेला तिसरा चेंडू विकेटकीपर एबी डिविलियर्सच्या मागच्या दिशेनं सीमारेषेबाहेर गेला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर रहाणेनं मिड विकेटच्या दिशेनं चौकार मारला. त्यानंतर अरविंदने पाचवा चेंडू फुलटॉस टाकला. त्या चेंडूवरही रहाणेनं चौकार मारला आणि सहाव्या चेंडूवर कव्हर ड्राईव्हला फटका मारत रहाणेनं सहा चेंडूत सहा चौकार मारण्याची चमकदार कामगिरी केली.