मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दोन धावपटूंचा मृत्यू झाला तर २२ धावपटूंना रुग्णालयात दाखल करावे लागले. सुव्रदीप बॅनर्जी (४०) आणि राजेंद्र बोरा (७४) अशी मृत्यू झालेल्या धावपटूंची नावे आहेत. धावत असताना अचानक ते कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई मॅरेथॉनच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले कोलकाताचे सुव्रदीप बॅनर्जी (४०) हे धावत असताना हाजी अली जंक्शनजवळ कोसळले. पोलिसांनी त्यांना तातडीने नायर रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बॅनर्जी हे धावताना कोसळल्याने त्यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला दुखापत होऊन रक्तस्राव झाला होता, तसेच त्यांच्या डाव्या गुडघ्याला मार लागला होता. बॅनर्जी यांचा सकाळी ८.३० वाजता मृत्यू झाल्याची माहिती नायर रुग्णालयाकडून देण्यात आली. तसेच नरिमन पॉईंट परिसरामध्ये राजेंद्र बोरा (७४) हे कोसळलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्यावर मुंबई मॅरेथॉनचे वैद्यकीय सहभागी असलेल्या एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटच्या डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रतिसाद देत नसल्याने त्यांना तातडीने बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांनी उपचाराला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची माहिती एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटचे क्रिटिकल केअरचे संचालक डॉ. विजय डिसिल्वा यांनी सांगितले.

हेही वाचा >>>इथिओपियाच्या धावपटूंनीच पुन्हा मुंबई गाजवली!

मुंबई मॅरेथॉनमध्ये ५८ हजार ९०० धावपटू सहभागी झाले होते. या सहभागी झालेल्या धावपटूंपैकी १८२० धावपटूंना धावताना पायात गोळे येणे, पाय मुरगळणे, निर्जलीकरण, थकवा आणि किरकोळ जखमा अशा विविध वैद्यकीय समस्यांना सामोरे जावे लागले. यातील २२ धावपटूंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बॉम्बे रुग्णालयात १४, जसलोक रुग्णालय ४, लीलावती रुग्णालय २, भाभा रुग्णालय १ आणि नायर रुग्णालयामध्ये एका रुग्णाला दाखल करण्यात आले.