नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मेरी कोमच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय देखरेख समितीला दोन आठवडय़ांची मुदतवाढ क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
देशातील आघाडीच्या महिला कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी सरकारकडून २३ जानेवारी रोजी बॉिक्सगपटू मेरीच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय देखरेख समितीची नियुक्ती करण्यात आली.
ही समितीच सध्या कुस्ती महासंघाचे दैनंदिन कामकाज पाहते आहे. त्यांना ब्रिजभूषण यांची चौकशी करून चार आठवडय़ांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, समिती सदस्यांच्या विनंतीनंतर त्यांना चौकशीसाठी दोन आठवडय़ांची मुदतवाढ देण्यात आली असून ते ९ मार्चला अहवाल सादर करतील.आघाडीच्या कुस्तीगिरांनी आंदोलन मागे घेतले असले, तरी त्यांनी अजून स्पर्धामध्ये भाग घेतलेला नाही. पुरेशा सरावाअभावी भारताच्या तारांकित कुस्तीगिरांनी झाग्रेब (क्रोएशिया) आणि ॲलेक्झांड्रिया (इजिप्त) येथील मानांकन स्पर्धामधून माघार घेतली.