भारताचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा दावा
इंग्लंडचे माजी जलदगती गोलंदाज फ्रँक टायसन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे मुंबई क्रिकेटशी असलेल्या नात्यांच्या आठवणींना अनेक माजी खेळाडूंनी सोमवारी एका श्रद्धांजली कार्यक्रमात उजाळा दिला. मुंबई क्रिकेट असोसिएशन – मफतलाल गोलंदाज योजनेशी संलग्न असलेल्या टायसन यांना त्या वेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून योग्य सहकार्य मिळाले नसल्याचा दावा भारताचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी केला.
कॉन्ट्रॅक्टर म्हणाले, ‘‘हृषीकेश मफतलाल यांनी मला गोलंदाज योजनेसाठी प्रशिक्षकाचा शोध घेण्याकरिता इंग्लंडला पाठवले. त्या वेळी किथ अॅण्ड्रय़ूज यांनी मला टायसनचे नाव सुचवले. तोपर्यंत केवळ जलदगती गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या टायसनची नवी ओळख मला झाली. मी त्याच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी थोडा वेळ देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कामात कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप होणार नाही या अटीवर होकार कळविला.’’
मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले नाही आणि प्रशिक्षणासाठी योग्य मैदानही उपलब्ध करून न दिल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘‘आम्हाला क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, पारसी जिमखाना आणि तत्सम मैदानांवर प्रशिक्षण द्यावे लागत होते. त्यामुळे इथे इतर कुणी प्रशिक्षण देण्यास तयार झाले नसते. त्यातही टायसन यांनी आपले काम सुरू ठेवले. मात्र, ही परिस्थिती न बदलल्यास आपण मायदेशी परत जाऊ, अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांनी प्रकरण योग्य रीतीने हाताळले.’’