श्रीलंकेच्या मोरतुवा शहरात सुरु असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे. भारतीय संघाने ६० धावांनी या सामन्यात बाजी मारली. भारताकडून फलंदाजीत अर्जुन आझाद आणि एन.टी. तिलक वर्माने शतकी खेळी करत ३०५ धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजीत मुंबईच्या अथर्व अंकोलेकरने ३ बळी घेत आपली चमक दाखवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुविद पारकर अवघ्या ३ धावा काढून माघारी परतला. यानंतर अर्जुन आझाद आणि तिलक वर्माने दुसऱ्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. अर्जुन आझादने १२१ तर तिलक वर्माने ११० धावांची खेळी केली. भारताचे हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर, मधल्या फळीतले फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र भारताने ९ गड्यांच्या मोबदल्यात ३०५ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून नसीम शाह, अब्बास आफ्रिदीने प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्याला आमिर अली आणि मोहम्मद आमिरने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. हैदर अली आणि अब्दुल बंग्लाझाईला विद्याधर पाटीलने माघारी धाडलं. यानंतर फहाद मुनीरही झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार रोहिल नाझीर आणि हारिस खानने पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. रोहिल नाझीरने ११७ धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजांना चांगलच झुंजवलं. अथर्व अंकोलेकरने हारिस खानला माघारी धाडत पाकिस्तानची जमलेली जोडी फोडली. यानंतर पाकिस्तानचे तळातल्या फळीतले फलंदाज फारशी आश्वासक खेळी करु शकले नाही. अखेरीस पाकिस्तानला २४५ धावांवर रोखत भारताने ६० धावांनी सामन्यात बाजी मारली. गोलंदाजीत भारताकडून अथर्व अंकोलेकरने ३, विद्याधर पाटील आणि सुशांत मिश्रा यांनी प्रत्येकी २-२ तर आकाश सिंह आणि करण लालने १-१ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.