युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने १९ वर्षाखालील महिला टी२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आयसीसी अंडर-१९ महिला टी२० विश्वचषकात अमेरिकेचा संघ सामील होणार आहे. त्याने गीतिका कोडाली, अनिका कोलन, अदिती चुडासामा आणि भूमिका भद्राजू यांचा संघात समावेश केला आहे. या खेळाडूंची नावे वाचून चाहत्यांना धक्काच बसला.
अमेरिका क्रिकेटने १५ खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. १४ ते २९ जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत आयसीसी अंडर-१९ महिला टी२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यूएसए संघातील बहुतांश खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. संघाचे नेतृत्व गीतिका कोडाली करत आहे, तर प्रशिक्षक संघाचे नेतृत्व वेस्ट इंडिजचा महान फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल करत आहे.
“दुबईच्या शानदार दौऱ्यानंतर, आम्ही सर्व खेळाडूंनी यूएसएसाठी या ऐतिहासिक विश्वचषकाच्या अंतिम तयारीवर लक्ष केंद्रित करत आहोत. आपण कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळू शकतो हे आम्ही वर्षभर केलेल्या मेहनतीतून दाखवून दिले. विश्वचषक जिंकणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र त्यात खेळायला मिळणे ही पण कमी महत्वाची बाब नाही. आम्ही या क्षणाशी आतुरतेने वाट पाहत आहोत विश्वचषकाच्या व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खरोखर उत्सुक आहोत,” शिवनारायण चंद्रपॉल, यूएसए महिला मुख्य प्रशिक्षक म्हणाले.
“अंतिम १५ खेळाडूंची निवड करताना काही कठीण निर्णय घ्यायचे होते, परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये युनायटेड स्टेट्समधील महिला आणि मुलींच्या खेळामध्ये आम्ही खूप खोलवर जाऊन अभ्यास केला आहे आणि त्याच्या खेळावरून हे स्पष्ट होते. दक्षिण आफ्रिकेत देशाचे पूर्ण क्षमतेने प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत,” यूएसए महिलांच्या राष्ट्रीय निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष रितेश कडू यांनी आपले मत व्यक्त केले.
महिला टी२० विश्वचषकही दक्षिण आफ्रिकेत होणार आहे
पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शफाली वर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. शफालीची टीम इंडियाची वरिष्ठ सहकारी रिचा घोष देखील अंडर-१९ संघाचा एक भाग आहे. शफाली अवघ्या १८ वर्षांची असून तिने ६९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शफालीने वरिष्ठ संघासोबत २ महिला कसोटी सामने, २१ महिला एकदिवसीय सामने आणि ४६ महिला टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दुसरीकडे, १९ वर्षीय रिचाने १७ एकदिवसीय आणि २५ टी२० सह एकूण ४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. महिला टी२० विश्वचषकही दक्षिण आफ्रिकेत होणार असल्याने या दोघांची निवड वरिष्ठ संघाला खूप मदत करेल, असा विश्वास राष्ट्रीय निवडकर्त्यांना आहे.
अ गटात अमेरिका ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याशी मुकाबला करेल. त्याची टीम पाहून लोक ट्विटरवर म्हणत आहेत की ही इंडिया बी टीम आहे.