पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने U-19 विश्वचषकाची यशस्वीरीत्या सुरुवात केली आहे. सलामीच्या सामन्यात भारताने बलाढ्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर १०० धावांनी मात केली. या सामन्यात पृथ्वी शॉने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने डावाची सुरुवात भक्कमपणे केली. पृथ्वी शॉ आणि मनजोत कालराने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाची भक्कम पायाभरणी केली. मात्र दोन्ही खेळाडूंना शतकाने हुलकावणी दिली. पृथ्वी शॉ ९४ तर मनजोत कालरा ८६ धावांवर माघारी परतला. यानंतर शुभमन गिलने मधल्या फळीतील फलंदाजांना हाताशी धरत भारताची बाजू लावून धरली. या जोरावर भारताने ३२८ धावांपर्यंत मजल मारली.

पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं क्षेत्ररक्षण हे सुमार दर्जाचं पहायला मिळालं. लॉईड पोपने भारतीय फलंदाजांचे दोन सोपे झेल टाकून भारताची धावसंख्या वाढवण्यात हातभार लावला. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड्सने ४ बळी टिपले, मात्र इतर गोलंदाजांना आपली फारशी छाप पाडता आली नाही.

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या डावाची सुरुवात अतिशय सावधपणे केली होती. एडवर्ड आणि ब्रायंट जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र या भागीदारीचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर करण्यात त्यांना अपयश आलं. पहिले २ बळी माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरु शकला नाही. ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज माघारी परतत राहिले. मधल्या फळीत जोनाथन मेर्लोच्या ३८ धावा आणि अखेरच्या फळीत बॅक्स्टर हॉल्टने केलेल्या ३९ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने भारताला थोडीशी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. भारताकडून शिवम मवी आणि कमलेश नागरकोटीने प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

Story img Loader