U-19 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नवोदीत पापुआ न्यू गिनीआचा १० गडी राखून धुव्वा उडवला. पापुआ न्यू गिनीआच्या संघाला अवघ्या ६४ धावांमध्ये सर्वबाद केल्यानंतर, भारताने हे आव्हान अवघ्या काही षटकांमध्ये पूर्ण केलं.
भारताचा कर्णधार पृथ्वी शॉने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. त्याने ३९ चेंडुत ५७ धावांची वादळी खेळी केली. पृथ्वी शॉच्या या खेळीत १२ चौकारांचा समावेश होता, या विजयासह भारताने सुपर लिग प्रकारात प्रवेश मिळवला आहे. याआधी पहिल्या साखळी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर १०० धावांनी विजय मिळवला होता.
त्याआधी भारताचा डावखुरा फिरकीपटू अनुकूल रॉयने ५ बळी घेत पापुआ न्यू गिनीआच्या संघाला खिंडार पाडलं. ज्यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या ६५ धावांचं आव्हान मिळालं होतं. साखळी फेरीत भारताचा अखेरचा सामना हा झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : पापुआ न्यू गिनीआ, सर्वबाद ६४. (अनुकूल रॉय ५/१४, मवी २/१६) विरुद्ध भारत ६७/०. (पृथ्वी शॉ ५७*, मनजोत कालरा ९*) निकाल – भारत १० गडी राखून विजयी