भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची ऑफर असतानाही राहुल द्रविडने मध्यंतरीच्या काळात U-19 संघाला प्रशिक्षण देणं पसंत केलं होतं. भारताची युवा पिढी घडवण्यात मला जास्त रस असल्याचं सांगत राहुल द्रविडने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदात आपल्याला स्वारस्य नसल्याचं म्हटलं होतं. सध्या U-19 विश्वचषकासाठी न्यूझीलंडमध्ये असणाऱ्या भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शुभम गिलने राहुल द्रविडच्या एका अनोख्या आव्हानाची कहाणी सांगितली आहे. तो icc-cricket.com या वेबसाईटशी बोलत होता.

“मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला. यावेळी U-19 संघाकडून खेळताना पहिल्या दोन वन-डे सामन्यांमध्ये मी हवेमध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झालो.” यावेळी राहुल सर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं, “तू इतका चांगला फलंदाज आहेस, तुझ्या फटक्यांमध्येही ताकद आहे. मग प्रत्येक चेंडू तुला हवेमध्येच का खेळायचा असतो?” पण त्यावेळी राहुल सरांच्या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नव्हतं.

अवश्य वाचा – एकमेव टी२० सामन्यात द्रविडने मारले होते तीन षटकार, जाणून घ्या त्याच्याविषयीच्या काही खास गोष्टी

यानंतर पहिल्या दोन सामन्यांमध्ये माझ्याकडून फारशी चांगली कामगिरी न झाल्याने राहुल सरांनी मला एक आव्हान दिलं. “पुढच्या सामन्यात मी एकही फटका हवेत न खेळता सगळे फटके हे जमिनीलगत खेळायचे असं आव्हान मिळालं. सरांनी दिलेलं आव्हान पूर्ण करण्याच्या जिद्दीने मी मैदानात तंतोतंत खेळ केला, आणि त्यानंतरच्या दोन सामन्यांत मी शतक झळकावलं.” माझ्या या कामगिरीनंतर राहुल सर पुन्हा माझ्याकडे येऊन म्हणाले, “बघितलंस तू Ground Shots खूप चांगले खेळतोस. मग धावा काढण्याच्या एवढ्या संधी उपलब्ध असताना हवेत फटके खेळण्याची गरजच काय?” राहुल सरांचा हा सल्ला आपण कायम लक्षात राहिलं, असंही शुभमने सांगितलं.

शुभम गिल हा पंजाबचा खेळाडू असून, वयाच्या १४ व्या वर्षी U-16 आंतरजिल्हा स्पर्धेत खेळताना त्याने आपल्या संघाकडून खेळताना ३५१ धावांची खेळी केली होती. सध्या शुभम U-19 विश्वचषकासाठी पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत शुमभच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – द्रविडपुत्र फलंदाजीत चमकला!

Story img Loader