न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचं सोमवारी मायदेशात आगमन झालं. चौथ्यांदा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेवर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. अंतिम फेरीत पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली.

अवश्य वाचा – BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!!

भारताचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ३ वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विजयासह पृथ्वी शॉ १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. सोमवारी मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर भारतीय संघाच्या स्वागतासाठी मीडियी आणि चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

अंतिम फेरीत मनजोत कालराने झळकावलेल्या शतकामुळे भारताचा विजय आणखीनच सोपा झाला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला सामना जिंकण्यासाठी २१७ धावांचं आव्हान दिलं होतं. जोनाथन मेरलो आणि परम उप्पलचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. ऑस्ट्रेलियाने दिलेलं हे आव्हान भारताने सहज परतवून लावलं.