रिशांक देवाडिगाच्या शानदार खेळाच्या बळावर यू मुंबाने प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील शुक्रवारच्या लढतीत दबंग दिल्लीवर २७-२५ असा रोमहर्षक विजय मिळवला. देवाडिगाने १४ चढायांमध्ये ८ गुणांची कमाई केली. या विजयासह मुंबाने ११ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. दिल्ली चार गुणांसह सातव्या स्थानी कायम आहे.

पहिल्या पाच मिनिटांत दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत असताना अनुप कुमारने १०व्या मिनिटाला चढाई करत मुंबाला ६-५ अशी आघाडी मिळवून दिली. काशिलिंग आडकेने दोन गुणांची कमाई करून दिल्लीला १३-९ असे आघाडीवर आणले. दुसऱ्या सत्रात सामना १५-१५ अशा बरोबरी असताना देवाडिगाने सुपर चढाईत तीन गुणांची कमाई करत सामन्यात चुरस निर्माण केली. अखेरच्या क्षणात देवाडिगा आणि अनुपला दिल्लीच्या काशिलिंग आणि सेल्वामणी के. यांनी तोडीस तोड उत्तर दिले.

दिल्लीकडून कडवा संघर्ष देताना सेल्वामणीने सामना २६-२५ असा अटीतटीचा आणला. मात्र अनुपने अखेरच्या चढाईत एक गुण कमवत मुंबाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

वॉवरिन्काला पराभवाचा धक्का

वृत्तसंस्था, लंडन

दुखापतींच्या ससेमिऱ्यात अडकलेल्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत चौथ्या मानांकित स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला नमवत खळबळनजक विजयाची नोंद केली.

गंभीर दुखापतीमुळे डेल पोट्रोची कारकीर्द धोक्यात आली होती. मात्र चिवट झुंज देण्यासाठी प्रसिद्ध डेल पोट्रोने जेतेपदासाठी शर्यतीत असलेल्या वॉवरिन्कावर विजय मिळवत अनोखा वस्तुपाठ सादर केला. डेल पोट्रोने वॉवरिन्कावर ३-६, ६-३, ७-६ (२), ६-३ असा विजय मिळवला.

बोपण्णाची विजयी सलामी

रोहन बोपण्णाने फ्लोरिन मर्गेआच्या साथीने सलामीच्या लढतीत खेळताना मारिन ड्रॅग्नजा आणि निकोला मेकटिक जोडीवर ७-५, ७-६ (८-६) अशी मात केली.

 

Story img Loader