अवघ्या सात मिनिटांत दोन लोण नोंदवीत सामन्यास कलाटणी देत यू मुंबा संघाने पुणेरी पलटण संघाला कबड्डी कसे खेळायचे याचा प्रत्यय घडविला. त्यांनी हा सामना ३९-३४ अशी मात करीत प्रो-कबड्डी लीगमध्ये आणखी एक सफाईदार विजय मिळविला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार अनुपकुमार, रिशांक देवडिगा, सुरेंदर नाडा यांच्यासह काही प्रमुख खेळाडूंना यू मुंबा संघाने विश्रांती दिली होती. त्यांच्या अनुपस्थितीत पुण्याकडून यू मुंबावर विजयाची अपेक्षा होती. कर्णधार वझीरसिंग व प्रवीण नेवाळे हे दोन्ही मुख्य चढाईचे शिलेदार जखमी असल्यामुळे पुण्याच्या चढाईची जबाबदारी संजयकुमार, जितेश जोशी व तुषार पाटील यांच्यावर आली होती. पूर्वार्धात गुणफलक १५-१५ अशी बरोबरी होती.
उत्तरार्धातही बराच वेळा दोन्ही संघांमध्ये बरोबरी होती. २८ व्या मिनिटाला लोण करण्याची संधी पुण्याला मिळाली होती, मात्र फाजल अत्राचेली याची पकड करण्याचा आततायी प्रयत्न पुण्याच्या अंगाशी आला. पाठोपाठ फाजल याने तुषार याची पकड करीत लोण वाचविला. त्यानंतर प्रदीपकुमारच्या चौफेर चढायांच्या जोरावर व अन्य सहकाऱ्यांनी केलेल्या शानदार पकडींमुळे यू मुंबा संघाने अवघ्या सात मिनिटांत दोन लोण चढवीत पुण्याच्या हातातून खेचून काढला. त्यानंतर आपली आघाडी कायम ठेवीत यू मुंबा संघाने बाजी मारली. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला पुण्याने लोण चढविला. या लोणमुळे यू मुंबाच्या विजयावर फारसा फरक पडला नाही. यू मुंबा संघाकडून प्रदीपकुमार याने अष्टपैलू खेळ केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा