भूपिंदर सिंगच्या हुकमी चढायांच्या बळावर यू मुंबाने बंगाल वॉरियर्सला ३१-१७ असे सहज पराभूत केले आणि प्रो कबड्डी लीगमध्ये अव्वल स्थानाचा पुन्हा कब्जा केला. याचप्रमाणे काशिलिंग आडकेच्या दमदार चढायांच्या बळावर यजमान दबंग दिल्लीने पाटणा पायरेट्सला ४५-२५ असे पराभूत केले.
नवी दिल्लीच्या त्यागराज क्रीडा संकुलात पाच हजार क्रीडा शौकिनांच्या साक्षीने मुंबईचा संघ पुन्हा विजयपथावर परतला. भूपिंदरने प्रारंभीपासून चढायांमध्ये गुण मिळवण्याचा सपाटा लावला. कर्णधार अनुप कुमारने त्याला तोलामोलाची साथ दिली. सामन्याच्या १९व्या मिनिटाला यू मुंबाने बंगालवर पहिला लोण चढवला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ३०व्या मिनिटाला बंगालने यू मुंबावर लोण चढवला. परंतु सामन्यावरील पकड मात्र यू मुंबाने अखेपर्यंत गमावली नाही. सामना संपायला तीन मिनिटे बाकी असताना यू मुंबाने दुसरा लोण चढवला. भूपिंदर आणि अनुपने चढायांचे प्रत्येकी सहा गुण गमावले. तर मोहित चिल्लरने पकडींचे चार गुण मिळवले. बंगालकडून चढायांमध्ये केदार लाल (५ गुण) चमकला. कर्णधार महेंद्र रजपूतला फक्त दोन गुण मिळवता आले, तर त्याची तीनदा पकड झाली.
दुसऱ्या लढतीत दिल्लीने प्रारंभीपासूनच सामन्यावर आपले वर्चस्व राखताना मध्यंतराला २६-११ अशी आघाडी घेतली, मग दुसऱ्या सत्रातही दिल्लीने पाटण्याला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. काशिलिंगने चढायांचे १३ गुण (१ बोनस) कमवले. राकेश भारद्वाजने अप्रतिम पकडी केल्या. पाटण्याकडून संदीप नरवाल आणि दीपक नरवाल यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा