क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या लढतीत बंगळुरू बुल्स संघाने यु मुंबा संघाला प्रो-कबड्डी लीगमध्ये पहिला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. बंगळुरूने हा सामना ३३-३० असाजिंकून साखळी गटात सहावा विजय नोंदविला. यजमान पुणेरी पलटण संघाने घरच्या मैदानावर बुधवारी पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी बंगाल वॉरियर्सवर ४०-३० अशी मात केली.
मुंबा संघाने पूर्वार्धात १४-१२ अशी आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात बंगळुरू संघाने उत्कृष्ट पकडी व खोलवर चढाया करीत विजयश्री खेचून आणली. ३४व्या मिनिटाला त्यांनी २४-२२ अशी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. बंगळुरू संघाच्या राजेश मंडलने सवरेत्कृष्ट चढाई व सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू ही दोन्ही पारितोषिके पटकावली. मुंबाच्या रिशांक देवडिगाला सर्वोत्तम बचावपटूचे बक्षीस मिळाले. १०व्या मिनिटाला मुंबाकडे ७-६ अशी आघाडी होती. १३-१६ अशा पिछाडीवरून बंगळुरू संघाने २९व्या मिनिटाला २०-२० अशी बरोबरी साधली.  ३६व्या मिनिटाला बंगळुरू संघाने मुंबावर निर्णायक लोण चढविला. त्यांच्या विजयात अजय ठाकूरही महत्त्वाचा वाटा होता. मुंबा संघाकडून अनुप कुमारने चढाईत ११ गुण मिळविले. मात्र त्याला अपेक्षेइतकी साथ शेवटच्या तीन मिनिटांमध्ये मिळाली नसल्याने सामन्याचा निकाल मुंबाच्या बाजूने लागला असता.
 पुण्याने उत्कृष्ट पकडीच्या जोरावर दहाव्या मिनिटालाच पहिला लोण नोंदविला. त्यानंतर आपले वर्चस्व राखत त्यांनी पूर्वार्धात आणखी एक लोण चढवित आपली बाजू बळकट केली. त्यांनी पूर्वार्धात २४-१० अशी आघाडी मिळविली. पुण्याच्या मनोज कुमार व दीपेश जोशी यांनी पकडीत दाखविलेले कौशल्य कौतुकास्पद होते. चढाईत वझिर सिंग व मंगेश भगत यांनी प्रत्येकी सहा गुण मिळविले.

पुणेरी पलटणची सामाजिक बांधिलकी !
मैदानावर खराब कामगिरी होत असली तरी पुण्याच्या खेळाडूंनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यांचे वेळी झालेल्या तिकीटविक्रीची सर्व रक्कम त्यांनी माळीण दुर्घटनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी संघाचे मालक इन्शुकोट्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लवकरच तेथे जाऊन हा निधी तेथील लोकांना देणार आहेत.

आजचे सामने
* बंगळुरू बुल्स वि. दबंग दिल्ली * पुणेरी पलटण वि. जयपूर पिंक पँथर्स. * वेळ : रात्री ८ वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

Story img Loader