दोन्ही संघ नव्या संघनायकांसह उतरल्यामुळे तेलुगू टायटन्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील लढतीचा थरार अखेपर्यंत टिकला. परंतु एक गुणाची आघाडी आपल्या संघाकडे असल्याच्या भ्रमात कर्णधार जसवीर सिंगने शेवटच्या चढाईत गुण घेण्याचा नाहक प्रयत्न करण्याऐवजी बचावात्मक पवित्रा स्वीकारला. त्यामुळे प्रो कबड्डी लीगमधील ही लढत ३९-३९ अशी बरोबरीत सुटली. पाटण्यात पाटणा पायरेट्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील लढत बरोबरीत सुटल्यानंतर ही सलग दुसरी लढत अनिर्णीत ठरली. मात्र यू मुंबाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना दिल्ली दबंग संघाला २९-२५ असे हरवून आठव्या विजयाची नोंद करताना गुणतालिकेतील अव्वल स्थान अबाधित राखले आहे.
हैदराबादच्या गचीबोली इनडोअर स्टेडियमवरील पहिल्या लढतीत तेलुगू टायटन्सने प्रारंभीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारत सातव्या मिनिटाला पहिला लोण चढवला आणि मध्यंतराला २०-१२ अशी आघाडी मिळवली. परंतु दुसऱ्या सत्रात जयपूरने ३०व्या मिनिटाला पहिला आणि ३६व्या मिनिटाला दुसरा लोण चढवून सामन्याचे पारडे आपल्याकडे झुकवले. परंतु राहुलने अखेरच्या पाच मिनिटांतील प्रत्येक चढाईत गुणांचा सपाटा लावत हा सामना संघाला बरोबरीत सोडवून दिला. राहुलने चढायांचे १४ तर सुकेश हेगडेने ९ गुणांची कमाई केली. इराणच्या हादी ओश्तोरॅकने पाच पकडी करीत क्रीडारसिकांचे लक्ष वेधले. जयपूरकडून सोनू नरवालने चढायांचे १३ गुण मिळवले, तर कुलदीपने पाच सुरेख पकडी केल्या. त्यांचा कर्णधार जसवीरच्या पाच वेळा पकडी झाल्या. ‘‘दुसऱ्या सत्रात आम्ही बचावात कमी पडलो, त्यामुळे विजयाने हुलकावणी दिली,’’ असे तेलुगू टायटन्सच्या सुकेश हेगडेने सांगितले.
दुसऱ्या सामन्यात दिल्ली दबंगने पहिल्या सत्रात १५-११ अशी आघाडी मिळवली होती. परंतु दुसऱ्या सत्रात त्यांना टिकवण्यात अपयश आले. ३२व्या मिनिटाला यू मुंबाने दिल्लीवर लोण चढवला आणि काशिलिंग आडकेच्या पकडी करण्यासाठी उत्तम रणनीती आखली. त्यामुळे यू मुंबाला हा शानदार विजय मिळवता आला. अनुपने चढायांचे ८ गुण मिळवले, तर रिशांक देवाडिगाने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. विशाल माने आणि जीवा कुमार यांनी दमदार पकडी केल्या. दिल्लीकडून काशिलिंगने पराभव टाळण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. दादासो आव्हाडने अप्रतिम पकडी केल्या.
आजचा सामना
तेलुगू टायटन्स वि. बंगाल वॉरियर्स
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी.