मुंबईच्या घरच्या मैदानावर ७७७ क्रमांकाच्या रिशांक देवाडिगाने मर्दुमकी दाखवत कबड्डीरसिकांची मने जिंकली. त्याला ७ क्रमांकाच्या अनुभवी राकेश कुमारने तोलामोलाची साथ दिली. त्यामुळे यू मुंबाने जयपूर पिंक पँथर्सला ३५-२१ असे हरवून स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमधील सलग सातव्या विजयाची नोंद केली. यासह वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या घरच्या मैदानावर यू मुंबाने दिमाखात ‘सत्ते पे सत्ता’ प्रस्थापित केली आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. याचप्रमाणे तेलुगू टायटन्सने गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या पटणा पायरेट्सला ४२-४१ असे फक्त एका गुणाने पराभूत करून आपले आव्हान शाबूत राखले.
रविवारच्या पहिल्या लढतीत रिशांकची पकड करून जयपूरने आपले खाते उघडले. मात्र त्यानंतर १७व्या मिनिटापर्यंत जयपूरला पुढचा गुण मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. रिशांक, राकेश आणि अनुप कुमार यांचे धारदार आक्रमण याचप्रमाणे फझल अत्राचाली आणि जीवा कुमार यांच्या पोलादी पकडी यांच्या बळावर यू मुंबाने वर्चस्व गाजवले. यात सातव्या आणि १४व्या मिनिटाला असे दोन लोण चढवत पूर्वार्धात २१-५ अशी आघाडी घेतली. यादरम्यान जयपूरच्या मोहम्मद मघसौदलाऊ आणि रोहित राणा या महत्त्वाच्या शिलेदारांना दुखापती झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र राजेश नरवाल आणि अनिल पाटीलने हिमतीने किल्ला लढवल्यामुळे २४व्या मिनिटाला जयपूरने यू मुंबावर पहिला लोण चढवला. त्यानंतर मात्र पुन्हा यू मुंबाच्या खेळाडूंनी त्वेषाने खेळत ३३व्या मिनिटाला तिसरा लोण चढवला. राकेशने तीन बोनस गुणांसह चढाईचे नऊ गुण मिळवले, तर एक पकडीचा गुण मिळवला. अनुपने आणि राकेशने चढायांचे अनुक्रमे सहा आणि पाच गुण प्राप्त केले. जयपूरकडून अनिल पाटीलने लक्ष वेधताना तीन बोनस गुणांसह सात गुण कमवले.

आजचा सामना
* यू मुंबा वि. पुणेरी पलटण
* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ व एचडी २, ३.

Story img Loader