यु मुंबाने एनएससीआय क्रीडा संकुलाच्या घरच्या मैदानावर चारही सामन्यांमध्ये अपराजित राहून दिमाखदारपणे प्रो-कबड्डी लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवले आहे. यु मुंबाने तिसऱ्या विजयाची नोंद करताना मंगळवारी पाटणा पायरेट्स संघाला ३६-३३ असे पराभूत केले. अनुप कुमार आणि शब्बीर बापू शरफुद्दीन यांच्या चढायांमुळेच मुंबईला हा विजय साकारता आला. पाटणा संघाकडून राकेश कुमारने एकाकी लढत दिली. परंतु त्यांना विजयानिशी हंगामाचा प्रारंभ करण्यात अपयश आले.
यु मुंबा आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामना प्रामुख्याने राकेश कुमार आणि अनुप कुमार या भारताच्या दोन प्रमुख खेळाडूंच्या चढायांमुळे रंगतदार ठरला. मध्यंतराला गुणफलक १९-१९ असा बरोबरीत होता. परंतु उत्तरार्धात यु मुंबा संघाने सोमवारी झालेल्या चुका प्रकर्षांने टाळून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यु मुंबाकडून अनुपने १६ चढायांमध्ये १० गुण घेतले, तर शब्बीरने १८ चढायांमध्ये ८ गुण कमवले. पाटणाकडून राकेशने १९ चढायांमध्ये सर्वाधिक १५ गुण मिळवले. यात ६ बोनस गुणांचा समावेश होता.
सामन्यानंतर राकेश कुमार म्हणाला, ‘‘आमचा बचाव थोडासा कमजोर आहे. पुढील सामन्यांमध्ये आम्ही त्यात सुधारणा करू. काही परदेशी खेळाडूंनाही आम्ही आजमावू शकतो.’’
पाटणाचे प्रशिक्षक रवी खोकर म्हणाले की, ‘‘वसिम सज्जड हा चांगला डावा कोपरारक्षक आहे. आधी आम्ही त्याच्यासोबत सराव करू. त्यानंतरच आम्ही त्याला खेळवू.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा