सहा महिन्यांतच पुन्हा एकदा अवतरलेल्या स्टार स्पोर्ट्सच्या प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच सामन्यात कबड्डीरसिकांना खेळाचा अस्सल थरार पाहायला मिळाला. परंतु अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या यू मुंबाने यजमान तेलुगू टायटन्सला २७-२५ असे हरवून विजयी सलामी नोंदवली. रिशांक देवाडिगा या विजयाचा शिल्पकार ठरला. दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सने दबंग दिल्लीचा ३५-२९ असा पराभव केला.
राजीव गांधी क्रीडा संकुलातील सलामीच्या सामन्यात प्रारंभी दोन्ही संघांत गुणांची चढाओढ सुरू होती. टायटन्सकडून सुकेश हेगडे, राहुल चौधरी तर यू मुंबाकडून अनुप कुमार गुण घेत होते. मात्र १९व्या मिनिटाला शब्बीर बापूला विश्रांती देऊन रिशांकला खेळवण्याची यू मुंबाची रणनीती यशस्वी ठरली. रिशांकच्या महत्त्वपूर्ण गुणांमुळे यू मुंबाने टायटन्सवर लोण चढवून मध्यंतराला १८-८ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात रिशांकने पुन्हा नेत्रदीपक चढायांचे सत्र चालू ठेवले. दुसऱ्या सत्रात सुकेश आणि राहुल यांनी सामना वाचवण्याचा निकराने प्रयत्न केला. तीन मिनिटे असताना टायटन्सने यू मुंबावर लोणसुद्धा चढवला. पण अखेर यू मुंबाने बाजी मारली. रिशांक ८ व अनुपने ६ गुण मिळवले, तर टायटन्सच्या सुकेशने ९ गुण मिळवले.
‘‘तेलुगू टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवण्याची आम्ही किमया साधली. शब्बीर, राकेश कुमार आणि माझ्यासह चढाईची आमची योजना होती. परंतु शब्बीरला पुरेसे यश मिळत नसल्याने आम्ही रिशांकला खेळवले आणि ते पथ्यावर पडले,’’ असे अनुपने सामन्यानंतर सांगितले. अभिनेता आमिर खानच्या राष्ट्रगीत गायनाने तिसऱ्या हंगामाला प्रारंभ झाला. या वेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू व अभिनेता राणा दगुबत्ती उपस्थित होते.
आजचे सामने
जयपूर पिंक पँथर्स वि. यू मुंबा
तेलुगू टायटन्स वि. पुणेरी पलटण
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ आणि एचडी २, ३.