U19 Asia Cup Final Highlights: अंडर-१९ आशिया कपचा अंतिम सामना भारत वि बांगलादेशच्या अंडर-१९ संघांमध्ये खेळवला जातहोता. बांगलादेशच्या संघाने या अंतिम फेरीत मोठा अपसेट करत भारताला पराभवाचा धक्का दिला आहे. अंडर-१९ आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत भारताला ५९ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. उभय संघांमधील हा सामना खूपच कमी धावसंख्येचा होता आणि बांगलादेश संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला.
बांगलादेशच्या अंडर-१९ संघाने घडवला इतिहास
बांगलादेश संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर-१९ आशिया चषकाचे विजेतेपद पटकावत इतिहास घडवला आहे. ही स्पर्धा १९८९ पासून खेळवली जात आहे. पण बांगलादेशचा संघ अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा संघ ठरला आहे, ज्याने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले आहे. यासोबतच टीम इंडियाने ८ जेतेपदांवर कब्जा केला आहे.
या दोन संघांव्यतिरिक्त, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी १ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्याचवेळी, टीम इंडियाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी, जेव्हा-जेव्हा भारतीय संघ अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता, तेव्हा त्यांनी विजेतेपद पटकावले होते.
भारताची फलंदाजी फ्लॉप
बांगलादेशने दिलेल्या १९९ धावांतच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युवा भारतीय संघाची फलंदाजी फळी फ्लॉप ठरली. भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगली सुरूवात करून देण्यात अपयशी ठरले. टीम इंडियाला पहिला धक्का आयुष म्हात्रेच्या रूपाने ४ धावांवर बसला. यानंतर सातत्याने विकेट पडत राहिल्या, त्यामुळे भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही. या सामन्यात वैभव सूर्यवंशीही केवळ ९ धावा करू शकला. याशिवाय केपी कार्तिकेयाने २१ धावा केल्या आणि सी आंद्रे सिद्धार्थही २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. निखिल कुमारला खातेही उघडता आले नाही. कर्णधार मोहम्मद अमानने लढाऊ खेळी नक्कीच खेळली, पण तोही संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर बांगलादेशचा डाव १९८ धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आले. भारताकडून युधाजित गुहा, चेतन शर्मा आणि हार्दिक राज यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतले. तर किरण चोरमले, केपी कार्तिकेय आणि आय़ुष म्हात्रे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. दुसरीकडे बांगलादेशकडून रिझान हसनने सर्वाधिक ४७ धावा केल्या. मोहम्मद शिहाब जेम्सनेही ४० धावांचे योगदान दिले. फरीद हसननेही ३९ धावांची खेळी खेळली.