U19 T20 WC 2025 Gongadi Trisha break Shweta Sehrawat record : मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आयसीसी महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ९ गडी राखून पराभव करून सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. या सामन्यात टीम इंडियाची सलामीवीर गोंगाडी त्रिशाने एक मोठी कामगिरी केली. गोंगाडी या स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वात मोठी मॅच-विनर ठरली.ज्यामध्ये तिने ३०० हून अधिक धावा केल्या. यासह तिने श्वेता सेहरावतचा विक्रम मोडला.

या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ८० धावांवर गुंडाळले. भारताकडून गोंगाडी त्रिशाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भारतीय संघाने प्रत्युत्तरात १ गडी गमावून ११.२ षटकांत ८४ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. विशेष म्हणजे भारतासाठी फलंदाजीतही गोंगाडी त्रिशाने सर्वाधिक नाबाद ४४ धावांची खेळी साकारली, ज्यामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा विश्ववचषकावर नाव कोरले.

त्रिशाने मोडला श्वेता सेहरावतचा विक्रम –

आयसीसी महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता गोंगाडी त्रिशाच्या नावावर नोंदवला गेला आहे. स्पर्धेत सात सामन्यात फलंदाजी करताना गोंगाडीने ७७.२५ च्या सरासरीने ३०९ धावा काढल्या. या बाबतीत, गोंगाडीने टीम इंडियाची खेळाडू श्वेता सेहरावतचा विक्रम मोडला, जिने २०२३ साली झालेल्या आयसीसी महिला अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत सात डावात ९९ च्या सरासरीने एकूण २९७ धावा केल्या होत्या. या स्पर्धेत गोंगाडीच्या बॅटमधून एक शतकी खेळी पाहायला मिळाली तर ती ३ डावात नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतण्यात यशस्वी ठरली. अंतिम सामन्यातही गोंगाडीने ३३ चेंडूत ४४ धावांची नाबाद खेळी साकारली.

वैष्णवी वर्माने घेतल्या सर्वाधिक १७ विकेट्स –

टीम इंडियाची डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक २०२५ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यात यश मिळवले. ज्यामध्ये तिने ६ सामन्यात ४.३५ च्या सरासरीने एकूण १७ विकेट्स घेतल्या. वैष्णवी आता आयसीसी महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे, ज्यात तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात मॅगी क्लार्कचा १२ विकेट्सचा विक्रम मोडला होता.

Story img Loader