शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२३ च्या अंडर-१९ टी २० विश्वचषकाची विजयाने सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात श्वेता शेरावतने भारतासाठी सर्वाधिक ९२ धावांची नाबाद खेळी साकारली. पण तरी देखील शेफाली चर्चेचा विषय ठरली. कारण तिने एकाच षटकांत धावांचा पाऊस पाडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्णधार शफाली वर्माने या सामन्यात २८१.२५ च्या स्ट्राइक रेटने १६ चेंडूत ४५ धावा केल्या. यादरम्यान तिने एकाच षटकात ५ चौकार आणि १ षटकार लगावत एकूण २६ धावा केल्या. शेफालीने या खेळीत एकूण ९ चौकार आणि १ षटकार लगावला.

शफाली वर्माने या २६ धावा पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकायला आलेल्या नथाबिसेंग निनीच्या गोलंदाजीवर केल्या. ५ षटकांनंतर भारताची धावसंख्या ४४ धावा होती, परंतु पॉवरप्ले संपल्यानंतर शफाली वर्माने संघाची धावसंख्या ७० पर्यंत नेली. शफालीने षटकातील पहिल्या ५ चेंडूत ५ चौकार लगावले, तर शेवटच्या चेंडूवर समोरच्या दिशेला शानदार षटकार लगावला. या षटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे तर दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-१९ महिला संघाची कर्णधार ओलुहले सिओ हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १६६ धावा केल्या. सायमन लॉरेन्सने ४४ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. त्याचवेळी मॅडिसन लँडसमॅनने ३२ धावा केल्या. अॅलेन्ड्री रेन्सबर्गने २३ धावा केल्या. भारताकडून शेफाली वर्माने २, तर शबनम आणि पार्श्वी चोप्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs SL: तिसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने श्री पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन घेतले दर्शन; पाहा पारंपारिक पोशाखातील फोटो

१६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार शफाली वर्मासह श्वेता शेरावतने संघाला दमदार सुरुवात करून दिली. श्वेताने आपल्या खेळीत २० चौकार लगावले तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताचा पुढील सामना १६ जानेवारीला होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U19 t20 world cup 2023 shefali verma scored 26 runs in a single over against south africa vbm