१९ वर्षांखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून मोठा पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावा करत भारतासमोर २५४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. वर्षभरात आयसीसी स्पर्धेच्या तिसऱ्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जागतिक कसोटी क्रिकेट २०२३, एकदिवसीय विश्वचषक २०२३ आणि आता युवका क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यामुळे पाकिस्तानकडून भारतीय खेळाडूंना चांगलेच ट्रोल करण्यात आले.
सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलियाच्या विजयाने मोहरून गेलेले दिसले. त्यांनी भारतीय युवा क्रिकेटपटू यांच्यासह इरफान पठाणलाही ट्रोल केले. इरफान फठाणच्या एका जुन्या पोस्टचा हवाला देऊन पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. २०२२ साली टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर इरफान पठाणने एक खोचक पोस्ट केली होती. भारताने पाकिस्तानविरुद्ध अतिशय चांगला खेळ खेळत जवळपास गमावलेला सामना खिशात घातला होता. “शेजाऱ्यांनो रविवार कसा होता?” अशी पोस्ट तेव्हा इरफान पठाणने केले होती.
U19 WC Final : “आमची तयारी चांगली होती, पण..”, पराभवानंतर कर्णधार उदय सहारनची प्रतिक्रिया
इरफानच्या या जुन्या पोस्टचा दाखला देऊन पाकिस्तानी चाहत्यांनी भारतीय संघाला ट्रोल केले. इरफान पठाणच्या एक्सवरील पोस्टनंतर सलग तीन आयसीसी स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला आहे आणि ही मालिका पुढेही सुरू राहिल, अशा पोस्ट काल पाकिस्तानकडून करण्यात आल्या. त्यानंतर संतापलेल्या इरफान पठाणनेही पाकिस्तानी ट्रोलर्सला खडे बोल सुनावले.
काय म्हणाला इरफान पठाण?
ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर इरफान पठाणने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले. तो म्हणाला, “पाकिस्तानचा १९ वर्षांखालील युवा क्रिकेट संघ अंतिम सामन्यात पोहचू शकला नाही, पण सीमेपलीकडील कीबोर्ड बडवणारे योद्धे आमच्या पराभवाचा आनंद लुटतायत. हा नकारात्मक दृष्टीकोन त्यांच्या देशाच्या मानसिकतेवर वाईट परिणाम टाकणारा आहे. #पडोसी”, अशी पोस्ट इरफान याने एक्स अकाऊंटवर टाकली.
मागच्या तीन महिन्यात भारतीय क्रिकेट संघ दोन वेळा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाशी भिडला. पण दुर्दैवाने दोन्ही सामन्यात भारताचा मुख्य संघ आणि १९ वर्षांखालील युवा संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानकडून भारतीय क्रिकेट संघावर जोरदार ट्रोलिंग करण्यात आले.
भारताचा युवा संघ निर्धारित ५० षटकंदेखील खेळू शकला नाही. ४३.५ षटकांत अवघ्या १७४ धावांपर्यंत भारतीय संघाच्या फलंदाजांना मजल मारता आली. सलामीवीर आदर्श सिंह (४७) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक (४२) या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा निकराने सामना केला. परंतु या दोघांव्यतिरिक्त इतर कुठल्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही.