आयसीसी १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत फायनलमध्ये धडक दिली आहे. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्याक भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या पडझडीनंतर कप्तान यश धुल आणि शेख रशीद यांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला २९१ धावांचे आव्हान दिले आहे. यशने शतक साजरे केले, तर रशीद शतकी उंबरठा ओलांडण्यापासून फक्त ६ धावांनी हुकला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारताचे लक्ष्य पेलवले नाही. १९४ धावांवर भारताने कांगारुंना गुंडाळले. भारत आता इंग्लंडविरुद्ध ५ फेब्रुवारीला अंतिम सामना खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव
कॅम्पबेल केलावे आणि टीग वायली या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. पण रवी कुमारने (१) वायलीला स्वस्तात बाद करत कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या कोरी मिलरसोबत केलावेने अर्धशतकी भागीदारी केली. अंगक्रिश रघुंवशीने ही भागीदारी मोडली. त्याने मिलरला (३८) पायचीत पकडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव घसरला, त्यांनी १०१ धावांवर पाच फलंदाज गमावले. भारताच्या विकी ओसवालने पुन्हा आपला खेळ बहरवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्याने शुल्झम आणि स्नेलला बाद करत कांगारूंच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. ४१.४ षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव १९४ धावांवर संपुष्टात आला. ओसवालने ३ तर रवी कुमार आणि निशांत सिद्धूला प्रत्येकी २ बळी मिळाले.
भारताचा डाव
अंगक्रिश रघुवंशी आणि हरनूर सिंग यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. संघाच्या १६ धावा फलकावर लावल्या अंगक्रिश (६) बाद झाला. विल्यम शुल्झमनने त्याचा त्रिफळा उडवला. हरनूरही लवकर माघारी परतला. जॅक निस्बेटने त्याला वैयक्तिक १६ धावांवर बाद केले. त्यानंतर कप्तान यश धुल आणि शेख रशीदने १६व्या षटकात भारताचे अर्धशतक पूर्ण केले. संघाला आधार देत या दोघांनी भागीदारी रचली. २८व्या षटकात भारताने आपले शतक फलकावर लावले. त्यानंतर यशने आपले अर्धशतक पूर्ण केले. रशीदसह त्याने शतकी भागीदारीही रचली. यशपाठोपाठ रशीदनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. खेळपट्टीवर स्थिरावल्यावर या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. ४५व्या षटकात यश धुलने आपले शतक साजरे केले. ४५ षटकात भारताने २ बाद २३७ धावा केल्या. शतकानंतर यश धावबाद झाला. त्याने १० चौकार आणि एका षटकारासह ११० धावांची जबरदस्त खेळी केली. पुढच्याच षटकात रशीद निस्बेटच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून बाद झाला. रशीदचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले. त्याने ८ चौकार आणि एक षटकार ठोकला. शेवटच्या पाच षटकात दिनेश बानाने झटपट खेळी केली. त्याने ४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २० धावा ठोकल्या. ५० षटकात भारताने ५ बाद २९० धावा उभारल्या.
हेही वाचा – VIDEO : वर्ल्डकपमध्ये ‘तो’ कॅच सोडल्यानंतर दोन दिवस झोपला नव्हता हसन अली; म्हणाला, “माझी बायको…”
दोन्ही संघांची Paying XI
भारत: अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, शेख रशीद, यश धुल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना (यष्टीरक्षक), राजवर्धन हंगरगेकर, विकी ओसवाल, रवी कुमार.
ऑस्ट्रेलिया: कॅम्पबेल केलावे, टीग वायली, कोरी मिलर, कूपर कॉनोली (कर्णधार), लचलान शॉ, निवेथन राधाकृष्णन, विल्यम शुल्झमन, टोबियास स्नेल (यष्टीरक्षक), जॅक सिनफिल्ड, टॉम व्हिटनी, जॅक निस्बेट.