U19 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेत आयर्लंडविरुद्धच्या लढतीत मुंबईकर मुशीर खानची बॅट तळपली. मुशीरच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने आयर्लंडवर २०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतणाऱ्या सर्फराझ खानचा मुशीर हा छोटा भाऊ. मुंबई क्रिकेटमध्ये सहाव्या वर्षी U14 स्पर्धेत खेळण्याचा विक्रम मुशीरने केला होता. योगायोग म्हणजे आजच मुशीरचा भाऊ सर्फराझनेदेखील शतक साजरं केलं. अहमदाबाद इथे सुरू असलेल्या इंग्लंड लायन्स आणि भारत अ यांच्यातील सामन्यात सर्फराझने १६१ धावांची तडाखेबंद खेळी केली.

ब्लोमफाऊंटन येथे झालेल्या लढतीत आयर्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला पण भारतीय फलंदाजांनी या निर्णयाचं सोनं केलं. आदर्श सिंग आणि अर्शिन कुलकर्णी झटपट बाद झाले. पण त्यानंतर मुशीर खान आणि कर्णधार उदय सहारन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५१ चेंडूत १५६ धावांची भागीदारी रचली. ७५ धावांची खेळी करुन उदय बाद झाला. मुशीरने आयर्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतकी खेळी साकारली. मुशीरने १०६ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ११८ धावांची खणखणीत खेळी केली. अरावेली अविनाशने २२ तर सचिन धसने २१ धावांच्या उपयुक्त खेळी केल्या. आयर्लंडकडून ऑलिव्हर रिलेने ३ विकेट्स पटकावल्या.

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव १०० धावातच गडगडला. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅनियल फोर्किनने सर्वाधिक २७ धावा केल्या. भारताकडून नमन तिवारीने ४ विकेट्स पटकावल्या. सौमी पांडेने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. मुशीर खानलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सलामीच्या लढतीत भारताने बांगलादेशला नमवलं होतं. या लढतीत मोठ्या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेत पुढच्या फेरीत आगेकूच करण्यादृष्टीने चांगली वाटचाल केली आहे.

मुशीरचा भाऊ सर्फराझने २०१४ आणि २०१६ U19 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. २०१६ स्पर्धेत सर्फराझने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या.

Story img Loader