करोना विषाणूचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसलेला आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या असून आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. आयपीएल स्पर्धा पूर्णपणे रद्द केल्यास बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठीच बीसीसीआय वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येणं शक्य आहे का याची चाचपणी करत आहेत. यासोबत यंदाचा हंगाम हा बाहेरील देशात भरवण्याचाही पर्याय बीसीसीआयसमोर उभा आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने लंकेत आयपीएल खेळवण्याचा पर्याय बीसीसीआयसमोर ठेवला होता.
यानंतर संयुक्त अरब अमिराती (UAE) ने ही बीसीसीआयसमोर आयपीएल आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. बीसीसीयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “UAE क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या आयोजनासंदर्भात उत्सुकता दाखवलेली आहे. परंतु सध्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी असल्यामुळे यावर बीसीसीआय कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. खेळाडू व इतर सदस्यांची सुरक्षा हा आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सध्या संपूर्ण जग करोनामुळे ठप्प झालेलं आहे. अशा परिस्थितीत आम्ही आता कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही.” धुमाळ यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना बीसीसीआयची बाजू स्पष्ट केली.
आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला सुमारे अडीच ते तीन हजार कोटींचं आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज आहे. याचसोबत प्रत्येक संघमालकांनाही १०० कोटींपेक्षा जास्त फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी आयपीएल स्पर्धा खेळवली जाणं गरजेचं असल्याचं मत काही दिवसांपूर्वी झालेल्या बीसीसीआय बैठकीत मांडण्यात आलं होतं. आतापर्यंत श्रीलंका आणि UAE या दोन देशांनी आयपीएलच्या आयोजनाबद्दल उत्सुकता दाखवली आहे. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्याच्या तयारीत नाही.